पाकिस्तान तुमचा गुलाम आहे का? ! – पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांचा पाश्‍चात्त्य देशांना प्रश्‍न

युक्रेनवरील आक्रमणासाठी रशियाचा निषेध करण्याच्या प्रस्तावावर मतदान करण्यास पाक अनुपस्थित !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – जेव्हा भारताने आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करून काश्मीरसाठीचा विशेषाधिकाराचा दर्जा काढला तेव्हा कोणत्याही पाश्‍चात्त्य देशाने भारताशी संबंध तोडले नाहीत. त्याच्यावर कोणते निर्बंध घातले नाहीत. तुम्ही सांगाल ते आम्ही करायला आम्ही तुमचे गुलाम आहोत का ?’ असा प्रश्‍न पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाश्‍चात्त्य देशांना एका सभेमध्ये बोलतांना विचारला.

युरोपीयन युनियनच्या सदस्य राष्ट्रांसह २२ राजनैतिक प्रमुखांनी १ मार्च या दिवशी संयुक्त पत्राद्वारे रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाचा निषेध करणार्‍या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारणसभेतील ठरावाला पाठिंबा देण्याचे पाकिस्तानला आवाहन केले होते. यासंदर्भातील पत्र सार्वजनिक करण्यात आले. युरोपीयन युनियने घेतलेल्या मतदानापासून पाकिस्तान दूर राहिला होता. त्याविषयी इम्रान खान यांनी वरील विधान केले. ‘युरोपीयन युनियनच्या राजदूतांनी भारताला असे पत्र दिले होते का ?’ असेही इम्रान खान यांनी विचारले. यासह त्यांनी ‘आम्ही रशिया, अमेरिका, चीन आणि युरोप यांचे मित्र आहोत. आम्ही कोणत्याही गटामध्ये नाही’, असेही स्पष्ट केले.