अधिग्रहीत भूमीचा मोबदला मूळ मालकाला मिळण्यासाठी कायद्यात सुधारणा करणार ! – सुभाष देसाई, उद्योगमंत्री

सुभाष देसाई, उद्योगमंत्री

मुंबई, ७ मार्च (वार्ता.) – शासनाकडून अधिग्रहीत करण्यात येणार्‍या भूमीच्या मोबदल्यातील ५० टक्के रक्कम मूळ मालकाला मिळावी, यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. या विधीमंडळाच्या अधिवेशनात सुधारणा करून हा कायदा आणू, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ७ मार्च या दिवशी दिली.

शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी ‘सरकारकडून अधिग्रहीत करण्यात येणारी भूमी शेतकर्‍यांकडून अल्प दरात खरेदी करून शासनाकडून मिळणारा अधिकचा दर दलाल मिळवतात. यावर सरकार काय उपाययोजना काढणार आहे ?’, असा प्रश्‍न लक्षवेधीमध्ये उपस्थित केला. त्यावर सुभाष देसाई यांनी वरील उत्तर दिले.

भूमी अधिग्रहीत करण्यासाठी पहिली अधिसूचना काढतांना जो भूमीचा मालक असतो, त्याच्याकडून भूमी घेतली जाते. शासनाकडून मिळणारा अंतिम मोबदला स्वत:ला मिळावा, यासाठी भूमीचा नवीन मालक न्यायालयात जाऊन मोबदला मिळवतो. यातून शेतकर्‍यांवर अन्याय होऊ नये, यासाठी हा कायदा करण्यात येणार आहे.