जीवनातील दु:ख न्यून करण्यासाठी अध्यात्माचा अभ्यास करून ते आचरणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
वल्लभगड (फरिदाबाद) – जर आम्ही खरोखर शिक्षित असू, तर ‘माझ्या जीवनात केवळ दु:खच आहे. त्यामुळे मला हे जीवन नको’, असा विचार एकाही विद्यार्थ्याच्या मनात येणार नाही. तसेच ‘माझे जीवन हे मला मिळालेली एक शिक्षा आहे’, असे कुणाला वाटत असेल, तर आम्ही खरंच योग्य शिक्षण घेतले आहे का ? असा प्रश्न स्वत:ला विचारला पाहिजे. आम्ही जीवनात अध्यात्माचा अभ्यास केला नाही, तर आमचे जीवन दु:खी आहे, असेच वाटेल. त्यामुळे जीवनातील दु:ख न्यून करण्यासाठी अध्यात्माचा अभ्यास करून ते आचरणात आणले पाहिजे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. येथील बालाजी महाविद्यालयामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी आयोजित केलेल्या व्याख्यानात ते मार्गदर्शन करत होते.
या वेळी बालाजी महाविद्यालयाचे मुख्य संचालक श्री. जगदीश चौधरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर भारत क्षेत्राचे संपर्क प्रमुख श्री. श्रीकृष्ण सिंघल, वाय.एम्.सी.ए. विद्यापिठाचे प्राध्यापक श्री. अरविंद गुप्ता, ‘युनिव्हर्सिटी ऑफ राजस्थान’चे प्राध्यापक श्री. एस्.के. गुप्ता, बालाजी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. चंद्रमोहन, बालाजी फार्मसी आणि बालाजी बी.एड् महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलन आणि श्री सरस्वतीदेवीची प्रार्थना करून झाला.
शिक्षणाच्या मुख्य उद्देशाविषयी सांगतांना सद्गुरु डॉ. पिंगळे म्हणाले की,
१. बहुतांश विद्यार्थ्यांना वाटते की, उच्च शिक्षण घेऊन मला एका मोठ्या आस्थापनेत नोकरी मिळावी, माझ्याकडे पुष्कळ पैसे, चारचाकी गाडी आणि बंगला असावा, तसेच माझ्याकडे सर्व प्रकारच्या सुख-सुविधा असतील, तर माझे जीवन आनंदी होईल. अशा प्रकारचे भौतिक शिक्षण घेऊन आपल्या जीवनात खरंच आनंद येईल का ?
२. अनेकांना वाटते की, आमच्याकडे ‘हॉवर्ड’ किंवा ‘केंब्रिज’ विद्यापिठांच्या पदव्या असतील, तर आम्ही देशासाठी काही करू शकू. आम्ही क्षमतेहून अधिक धन मिळवले, तर आमचे जीवन अधिक सुखी होईल; पण खरंच सुखी व्हायचे असेल, तर आपल्याला सुख-दु:ख यांचा अभ्यास केला पाहिजे. सुख काय असते, हे समजून घेतले पाहिजे.
३. उच्च शिक्षण घेऊन जर मनासारखी नोकरी मिळाली नाही, तर हेच शिक्षण आमच्या दु:खाला कारण बनते. त्यामुळे आम्ही जीवनाचा मूळ उद्देश समजून घेतला आणि योग्य प्रयत्न केले, तर निश्चित यशस्वी होऊ शकतो.