रशियाने माघार घेतली, तर भविष्यात होऊ शकणारे परिणाम !
‘रशिया-युक्रेन युद्धामध्ये लक्षात घ्यायला हवे की, रशियाच्या सैन्याचे ‘ऑपरेशन्स’ (मोहीम) ज्या वेगाने होईल, असे त्याचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना वाटत होते; पण प्रत्यक्षात तसे होतांना दिसत नाही. युक्रेनचे सैन्य त्यांना चांगला लढा देत आहे. ११ दिवस होऊनही रशियाच्या सैन्याला पुरेसे यश मिळत नाही. रशियाला भीती आहे की, पाश्चात्त्य देश आणि ‘नाटो’ (उत्तर अटलांटिक करार संघटना) युक्रेनला विविध प्रकारचे साहाय्य करतील. त्यामुळे त्यांची लढण्याची क्षमता वाढेल; म्हणून पुतिन सर्वांना ‘आम्ही तुमच्यावर आक्रमण करू आणि वेळ पडल्यास अणूबाँबचाही वापर करू’, अशा धमक्या देत आहेत. या राष्ट्रांनी युक्रेनला साहाय्य करू नये आणि युक्रेनमध्ये सरकार पालटण्यात यश मिळावे, ही पुतिन यांची इच्छा आहे.
चर्चेतून काहीतरी निष्पन्न होईल, अशी शक्यता नसणे
रशिया आणि युक्रेन यांच्यातील चर्चेची तिसरी फेरी चालू झालेली आहे; परंतु दोघांमध्येही मतभिन्नता आहे. युक्रेनला ‘युद्धविराम व्हावा’, असे वाटते, तर रशियाला ‘युक्रेनने त्यांना कायमचे आश्वासन द्यावे की, युक्रेन कधीही नाटोमध्ये सहभागी होणार नाही’, असे वाटते. या दोन्ही मागण्या मान्य होणे जवळजवळ कठीण दिसत आहे. त्यामुळे चर्चेतून काहीतरी निष्पन्न होईल, असेतरी काही वाटत नाही.
रशिया युद्धात हरल्यास पुतिन यांच्यावर होणारा परिणाम
या युद्धात रशियाला माघार घ्यावी लागली, तर रशियासाठी विशेषत: पुतिन यांच्यासाठी भयानक परिणाम होतील. एक बलशाली पुरुष म्हणून पुतिन यांची ओळख आहे. त्यांना वाटते की, पूर्वी जसा रशिया एक सोव्हिएत संघ होता आणि ती एक महाशक्तीही होती, तसा पुन्हा रशिया सोव्हिएत संघ बनेल. त्यांच्याविषयी देशाला फार अपेक्षा आहेत. त्यांचा पराभव झाला, तर त्यांना निश्चित सत्तेचा त्याग करावा लागेल आणि त्यांच्या ठिकाणी पुतिन यांचा समर्थक नसलेला दुसरा देता येईल. त्यामुळे पुतिन हे युद्ध हरले, तर त्यांच्या सत्तेचा अंत निश्चित जवळ येईल. त्यामुळे पाश्चात्त्य जगाला ‘आम्ही पुतिन किंवा चीन यांच्यासारख्या एका शत्रूराष्ट्राचाही पराभव करू शकतो’, असा उत्साह येईल.
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.