खर्चाच्या अंदाजपत्रकास मान्यता मिळाल्यावर उपजिल्हा रुग्णालयाचे काम पूर्ण करणार ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री
जालना, ६ मार्च (वार्ता.) – मंठा येथे उपजिल्हा रुग्णालय तसेच अधिकारी आणि कर्मचारी यांचे निवासस्थान याचे काम प्रस्तावित आहे. याविषयीचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिले असून पुढील कार्यवाहीसाठी ते संभाजीनगर (औरंगाबाद) येथील आरोग्य सेवा उपसंचालक यांना प्राप्त झाले आहे. प्रशासकीय मान्यता आणि निधी उपलब्धतेसाठी हे अंदाजपत्रक मुंबई येथील आरोग्य सेवा संचालनालयाचे आयुक्त शासनास सादर करतील. या अंदाजपत्रकास मान्यता प्राप्त झाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेमध्ये दिली.
४ मार्च या दिवशी विधान परिषदेत तारांकित प्रश्नोत्तरावेळी आमदार राजेश राठोड यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावर मंत्री टोपे यांनी लेखी उत्तर दिले आहे.