राज्यपालांचे काम राज्यघटनेनुसारच चालते ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
नागपूर – राज्यपालांवर टीका करायची, त्यांच्या विरोधात बोलायचे, एक प्रकारे त्यांच्या विरोधात कथानक सिद्ध करायचे. हा प्रयत्न सातत्याने होत आहे. राज्यपाल हे एका संवैधानिक पदावर बसलेली व्यक्ती आहे आणि ती राज्यघटनेचेच काम करते. त्यामुळे त्यांना लक्ष्य करणे अतिशय चुकीचे आहे, असे शब्दांत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविषयी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. नागपूर विमानतळावर ते ५ मार्च या दिवशी पत्रकारांशी बोलत होते.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यांवर महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीका केली होती. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी सत्ताधार्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे राज्यपाल अभिभाषण अर्धवट सोडून निघून गेले होते. त्याचा मंत्रिमंडळाने निषेध केला. फडणवीस पुढे म्हणाले, ‘शिवसेना नेते संजय राऊत आणि महाविकास आघाडीतील नेते यांचे दूरभाष ध्वनीमुद्रित (फोन टॅपिंग) केले जातात’, हा आरोप बिनबुडाचा आहे. या सर्व आरोपांनी माझे मनोरंजन होत आहे. या आरोपांत काहीच तथ्य नाही.