डबेवाले हे मुंबईची ‘लाईफलाईन’ ! – आदित्य ठाकरे, पर्यावरणमंत्री

डबेवाला भवनाचे उद्घाटन प्रसंगी आदित्य ठाकरे

मुंबई – डबेवाले हे मुंबईची ‘लाईफलाईन’ (जीवनवाहिनी) असून ही लाईफलाईन जगवायला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी येथे केले. मुंबईतील वांद्रे येथील डबेवाला भवनाचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. या वेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब उपस्थित होते.

या वेळी आदित्य ठाकरे पुढे म्हणाले आहेत की, मुंबईकरांची सेवा करणारी आपली जशी ही चौथी पिढी आहे (डबेवाल्यांची), तशीच आमची ही चौथी पिढी आहे. मुंबईच्या डबेवाल्यांचा १३० वर्र्षांचा इतिहास आहे. चोख व्यवस्थापनामुळे नावलौकिक मिळाल्याने जगभरातून अनेक पर्यटक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी डबेवाल्यांचे व्यवस्थापन जाणून घेण्यासाठी मुंबईमध्ये त्यांना भेटण्यासाठी येत असतात. असे पर्यटक आणि विद्यार्थी यांना व्यवस्थापनाचे धडे शिकवण्यासाठी आणि डबेवाला कामगारांच्या कल्याणासाठी त्यांच्या सन्मानार्थ मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून बांद्रा-पश्चिम येथे ‘डबेवाला भवन’ बांधण्यात आले आहे.