राज्यातील सव्वा लाख शाळांमध्ये दिव्यांग (विकलांग) मुला-मुलींसाठी स्वच्छतागृहे नाहीत ! – आमदारांचा गंभीर आरोप

देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना दिव्यांगांना (विकलांगांना) साधी स्वच्छतागृहेही उपलब्ध न होणे हे लज्जास्पद ! – संपादक

विधानसभा

मुंबई, ६ मार्च (वार्ता.) – राज्यातील सव्वा लाख शाळांमध्ये दिव्यांग मुला-मुलींसाठी स्वच्छतागृहे नाहीत. त्यामुळे स्वच्छता गृहांअभावी अपंग मुला-मुलींची गैरसोय होत आहे, त्यासाठी सरकार काय करत आहे ? असा गंभीर प्रश्न भाजपच्या आमदार श्रीमती मोनिका राजळे, आमदार श्रीमती श्वेता महाले आणि शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी विधानसभेत लेखी प्रश्नाद्वारे उपस्थित केला. या संदर्भात शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी लेखी उत्तरात हे अंशत: खरे असल्याचे मान्य करून ज्या शाळांमध्ये अशा सुविधा उपलब्ध नाहीत, त्या शाळांमध्ये शौचालये बांधणे, कमोड खुर्ची खरेदी करणे, तसेच भारतीय शौचकुपांवर विशेष आसंदी ठेवून सुविधा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती दिली आहे. (शालेय शिक्षणमंत्र्यांनी केवळ  माहिती देऊन न थांबता या सुविधा आतापर्यंत का देण्यात आल्या नाहीत आणि उर्वरित सुविधा किती कालावधीत देणार आहेत ? हेही सांगणे अपेक्षित आहे ! – संपादक)