जानेवारी २०२२ मध्ये ९२ माता, तर १ सहस्र १६६ अर्भक यांचा मृत्यू !
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही राज्यात अर्भक आणि माता यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असणे लज्जास्पद आहे ! – संपादक
मुंबई, ६ मार्च (वार्ता.) – राज्यात बाळंतपणाच्या वेळी माता आणि अर्भक यांच्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. सरकारच्या आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीच्या अहवालानुसार जानेवारी २०२२ मध्ये बाळंतपणाच्या वेळी ९२ मातांचा, तर १ सहस्र १६६ अर्भकांचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ४ मार्च या दिवशी विधान परिषदेच्या तारांकित प्रश्नांच्या पुस्तकामधील आरोग्यविषयक एका प्रश्नाला राजेश टोपे यांनी दिलेल्या उत्तरामध्ये वरील माहिती दिली आहे.
भाजपचे आमदार डॉ. रणजित पाटील यांनी आदिवासी पाड्यांतील गर्भवती महिलांच्या प्रसृतीच्या वेळी रुग्णवाहिका मिळवून देण्यासाठी परिचारिका आणि आशासेविका यांना वेळ मिळत नाही. त्यामुळे माता आणि अर्भके यांचा मृत्यू होतो. याविषयी सरकार कोणती उपाययोजना करत आहे ? याविषयी प्रश्न उपस्थित केला. त्यावर आरोग्यमंत्री टोपे यांनी लेखी उत्तर दिले आहे. आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीच्या अहवालानुसार डिसेंबर २०२१ मध्ये बाळंतपणाच्या वेळी १०१ मातांचा, तर १ सहस्र ३३६ अर्भकांचा मृत्यू झाल्याचेही उत्तरात म्हटले आहे. गरोदरपणातील संपूर्ण आरोग्य पडताळणी आणि उपचार यांसाठी उपाययोजना सुचवण्यासाठी सरकारने आरोग्य विभागाच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली नवजात बालरोग अन् स्त्रीरोग तज्ञांची समिती स्थापन केली आहे. या समितीच्या मार्गदर्शनानुसार अतिरिक्त उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.