कर्नाटकमधील मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यात येणार !
कर्नाटकच्या विधानसभेत सरकारकडून प्रस्ताव सादर !
कर्नाटकातील भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! आता देशातील अन्य राज्यांनीही असा निर्णय घेतला पाहिजे, यासाठी हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी प्रयत्न करावा ! – संपादक
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकमधील भाजप सरकारचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारीकरण करण्यात आलेल्या मंदिरांना मुक्त करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. राज्य सरकारच्या अंतर्गत ३४ सहस्र मंदिरे आहेत.
Karnataka to do away with government control over temples, says CM Bommai in budget speech#MuktKaroMandir #Karnataka https://t.co/iSHQtLJbEB
— TIMES NOW (@TimesNow) March 5, 2022
मंदिरांचा विकास करण्याचा अधिकार मंदिरांकडे सोपवला जाणार !
मुख्यमंत्री बोम्माई यांनी मंदिरांविषयी सांगितले की, मंदिरांचे सरकारीकरण रहित करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. भक्तांच्या या मागणीचा विचार करून धर्मादाय विभागाच्या अंतर्गत येणार्या मंदिरांना सरकारीकरणातून मुक्त करण्यात येणार आहे. मंदिरांचा विकास करण्याचा अधिकार मंदिरांकडे सोपवला जाणार आहे.
काशी यात्रेसाठी जाणार्यांना ‘पवित्र यात्रा’ योजना चालू करणार !
काशी यात्रेला जाणार्या ३० सहस्र यात्रेकरूंना प्रत्येकी ५ सहस्र रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याचीही घोषणा मुख्यमंत्री बोम्माई यांनी केली. यासाठी राज्य पर्यटन विकास मंडळ ‘पवित्र यात्रा’ योजना चालू करणार आहे.
हनुमंताच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी १०० कोटी रुपये खर्च करणार
राज्यातील कोप्पल जिल्ह्यातील श्री हनुमानाचे जन्मस्थान मानल्या जाणार्या आंजनाद्री पर्वताच्या विकासासाठी १०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
शेतकर्यांना २ सहस्र देशी गायींचे वितरण करण्यात येणार
मुख्यमंत्र्यांनी गोशाळांतील गायींना दत्तक घेण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी संस्थांना आवाहन करणारी योजनाही बनवली असल्याची माहिती दिली. मुख्यमंत्री बोम्माई यांनी सांगितले, ‘देशी गायींचा वंश संरक्षित करणे आणि तो वाढवणे यांसाठी कर्नाटक दुग्ध महासंघाच्या वतीने शेतकर्यांना २ सहस्र देशी गायींचे वितरण करण्यात येणार आहे. गोशाळेतील कचर्याद्वारे पर्यावरणपूरक उत्पादने केली जाणार आहेत. यासाठी सरकार आर्थिक साहाय्य देणार आहे.’