परिस्थिती सहजतेने स्वीकारणार्या आणि साधनेची तीव्र तळमळ असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. अंजली यशवंत कणगलेकर (वय ६६ वर्षे) !
‘आमच्या (माझ्या आणि सौ. अंजलीच्या) लग्नाला ४६ वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत मला सौ. अंजलीची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. सहनशीलता आणि परिस्थिती स्वीकारणे
मागील ४६ वर्षांत सौ. अंजलीला अनेक शारीरिक त्रास झाले आहेत. काही वेळा तर ‘ती जिवंत रहाते कि नाही ?’, अशी परिस्थिती असायची. अशा प्रसंगांत तिने दाखवलेली सहनशीलता आणि तिची परिस्थिती स्वीकारण्याची वृत्ती वाखाणण्यासारखी होती. त्यांपैकी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
१ अ. प्रवास करतांना बसवर दगडफेक होऊन पत्नीच्या डोळ्याला दगड लागणे, त्या जखमेतून होणारा रक्तस्राव पाहून पती बेशुद्ध होणे आणि जखमी अवस्थेतही पत्नीने पतीच्या तोंडवळ्यावर पाणी शिंपडून त्यांना शुद्धीवर आणणे : वर्ष १९९० मध्ये आम्ही माझ्या नोकरीनिमित्त अयोध्येजवळील टांडा या ठिकाणी रहात होतो. आम्ही बेळगावला सुटीसाठी गेलो होतो आणि धाकटा मुलगा सत्यकाम याला बेळगाव येथील शाळेत घालून आम्ही बेळगावहून अयोध्येला परत चाललो होतो. आम्ही बसने प्रवास करत असतांना आमच्या बसवर दगडफेक झाली आणि त्यांतील एक दगड अंजलीच्या डोळ्याला लागला. अंजलीच्या डोळ्याला झालेल्या जखमेतून होत असलेला रक्तस्राव पाहून मी बेशुद्ध झालो; परंतु त्याही स्थितीत तिने माझ्या तोंडवळ्यावर पाणी शिंपडून मला शुद्धीवर आणले.
१ अ १. पत्नीचा डोळा निकामी होणे आणि आधुनिक वैद्यांनी शस्त्रकर्म करून तिचा निकामी झालेला डोळा काढणे : प्रथमोपचार मिळाल्यावर आम्ही तिला लखनौ (उत्तरप्रदेश) येथील ‘केजीएम्’ या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात भरती केले. तिच्या डोळ्याला लागलेल्या मारामुळे तिचा तो डोळा निकामी झाला होता. ‘तो डोळा काढून टाकल्यासच दुसरा डोळा सुरक्षित राहील आणि भविष्यात काही गुंतागुंतीचे त्रास होणार नाहीत’, असे तेथील आधुनिक वैद्यांनी आम्हाला सांगितले. त्यामुळे नाईलाजाने तिच्या डोळ्याचे शस्त्रकर्म करावे लागले. जिवावर बेतलेल्या या संकटाला अंजलीने पुष्कळ धैर्याने तोंड दिले.
१ आ. सेवेनिमित्त सतत एकमेकांपासून दूर रहावे लागणे आणि पत्नीने ते आनंदाने स्वीकारणे : आम्ही सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना चालू केल्यानंतर काही काळाने मी नोकरी सोडली. नंतर मी जवळजवळ वर्षभर सेवेसाठी भारतभर प्रवास करत होतो. माझी आणि अंजलीची गाठभेट वर्षातून ३ – ४ दिवसच असायची; परंतु तिने हे सर्व आनंदाने स्वीकारले आणि मुलांवर (श्री. सत्यकाम आणि होमिओपॅथी वैद्य अंजेश यांच्यावर) साधनेचे संस्कार केले.
१ इ. स्नानगृहात गेल्यावर अकस्मात् डावा पाय लुळा पडणे आणि दुसर्याच दिवशी ‘वॉकर’ घेऊन सेवेला जाणे : जानेवारी २०२१ मध्ये अंजली अंघोळीसाठी गेली असतांना तिचा डावा पाय अकस्मात् लुळा पडला. त्याही स्थितीत ती बसत बसत प्रसाधनगृहातून खोलीत आली. तिच्या अशा स्थितीत ‘नेमके काय करावे ?’, हे आम्हाला कळत नव्हते; पण दुसर्या दिवसापासून ती ‘वॉकर’ (चालतांना आधार मिळण्यासाठी वापरण्यात येणारे साधन) घेऊन सेवेला गेली.
२. त्यागी वृत्ती
आम्ही साधनेत आल्यावर आम्हाला अर्पणाचे महत्त्व कळले. एका गुरुपौर्णिमेला अंजलीने तिच्याकडील मंगळसूत्र वगळता सर्व दागिने गुरुकार्यासाठी अर्पण केले.
३. सेवाभाव आणि साधनेची तळमळ
अ. ‘आमच्या वास्तूचा वापर गुरुकार्यासाठी व्हावा’, असा विचार करून तिने आमच्या घरी साधकांचे भोजन आणि निवास यांची व्यवस्था मनापासून केली. तिच्यातील या भावामुळेच अनेक सद्गुरु, संत आणि साधक आमच्या घरी वास्तव्य करायचे. त्यामुळे ती वास्तूही पावन झाली.
आ. मागील २० वर्षांपासून अंजली रामनाथी आश्रमात राहून सेवा आणि साधना करत आहे. तिने अनेक शारीरिक त्रास सहन करत अथक सेवा केली आहे. रामनाथीहून काही कालावधीसाठी ती बेळगाव येथे घरी गेली, तरी तिथेही घरातील कामांसह संगणकीय सेवाही करत असे. तिच्यातील साधनेच्या तळमळीमुळे मुलेही पूर्णवेळ साधना करत आहेत. मलाही साधना करण्याचा विचार तिच्याकडूनच मिळाला.
इ. ‘आमचे बेळगाव येथील रहाते घर विकून साधनेसाठी रामनाथी आश्रमातच रहायला जायचे’, असा आमचा निर्णय झाल्यावर कोणत्याही प्रकारचा विकल्प किंवा विचार मनात न आणता तिने तत्परतेने घर विकण्याची प्रक्रिया चालू केली आणि ५ मासांतच ती पूर्ण करून आम्ही रामनाथी आश्रमात रहायला आलो.’
– श्री. यशवंत कणगलेकर (पती, वय ७३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१२.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |