गडचिरोली जिल्ह्यात धान खरेदीची समयमर्यादा वाढवण्यास सरकारचा नकार
विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
मुंबई, ५ मार्च (वार्ता.) – गडचिरोली जिल्ह्यात पणन हंगाम वर्ष २०२१-२२ मध्ये किमान आधारभूत मूल्य खरेदी योजनेच्या अंतर्गत खरीप हंगामातील धान खरेदीची समयमर्यादा ३० जानेवारी २०२२ नंतर वाढवण्यात आली होती; मात्र ‘ऑनलाईन’ तांत्रिक अडचणी, गोदामे पूर्ण क्षमतेने भरलेली असणे यांसह अन्य कारणांमुळे धान खरेदीची प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे शेतकर्यांकडे मोठ्या प्रमाणात धान विक्रीसाठी शिल्लक असल्याने खरेदीचा कालावधी ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात यावा, अशी मागणी आमदार कृष्णा गजबे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या घंट्यात केली. यावर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी यापूर्वी ही समयमर्यादा ३ वेळा वाढवण्यात आली असल्याचे सांगत आणखी समयमर्यादा वाढवून देण्यास नकार दिला.
या संदर्भात उत्तर देतांना भुजबळ म्हणाले, ‘‘१ ऑक्टोबर २०२१ ते ३१ जानेवारी २०२२ असा धान खरेदीसाठी कालावधी निश्चित केला होता. मागणीनुसार प्रथम हा कालावधी ८ फेब्रुवारी, नंतर १४ फेब्रुवारी आणि त्यानंतर १८ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आला. यानंतर समयमर्यादा वाढवून मागण्यात आलेली नाही. त्यामुळे अशी वाढ देता येणार नाही. यापुढील काळात जर शेतकर्यांकडून अशी मागणी आली, तर त्याचा विचार केला जाईल. खरीप हंगामात १७ लाख ३६ सहस्र ९८३ क्विंटल इतकी धान खरेदी करण्यात आली आहे.’’