धान्याचा अपहार करणार्या रास्त भाव दुकानाचे अनुज्ञप्तीपत्र (परवानापत्र) रहित करणार ! – छगन भुजबळ, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री
स्वस्त धान्याचा काळाबाजार करून गरिबांच्या तोंडचा घास लुबाडणार्यांना कठोर शिक्षाच हवी ! – संपादक
मुंबई, ५ मार्च (वार्ता.) – यवतमाळ जिल्ह्यातील तिवसा या गावातील एका रास्त भाव दुकानदाराने धान्यवाटपामध्ये अपहार केल्याची तक्रार आमच्या विभागाला प्राप्त झाली होती. प्रत्यक्ष पडताळणी केल्यानंतर शिधापत्रिकाधारकांना केलेल्या धान्यवाटपामध्ये तफावत असल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित रास्त भाव दुकानदाराकडून अपहार केलेल्या धान्याची रक्कम वसूल करण्यात आली असून प्राधिकार पत्राची १०० टक्के अनामत रक्कम शासन जमा करून रास्त भाव दुकानदाराचे अनुज्ञप्तीपत्र (परवानापत्र) रहित करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकार्यांना दिले आहेत, अशी माहिती राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
आमदार श्रीमती माधुरी मिसाळ आणि अन्य आमदार यांनी उपस्थित केलेला रास्त भाव दुकानातील धान्य अपहाराविषयीचा तारांकित प्रश्न ४ मार्च या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तरामध्ये उपस्थित करण्यात आला होता. त्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी वरील लेखी उत्तर दिले आहे. मंत्री भुजबळ यांनी दिलेल्या आदेशास पुनर्निरीक्षण प्रकरणामध्ये अमरावती येथील पुरवठा उपायुक्त यांनी स्थगिती दिली आहे.