तिसर्‍या जागतिक महायुद्धाविषयीचे भविष्यकथन, महायुद्धाचे दुष्परिणाम आणि त्यातून वाचण्यासाठी करावयाचे उपाय

तिसर्‍या महायुद्धात होणारी हानी यापूर्वीच्या महायुद्धांपेक्षा भयावह असल्याने त्यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी साधना करणे आवश्यक !

तिसर्‍या जागतिक महायुद्धाचे टप्पे

परात्पर गुरु डॉ. आठवले

पुढे दिलेल्या सारणीत तिसर्‍या जागतिक महायुद्धाच्या आरंभापासून त्याच्या अंतापर्यंतचा घटनाक्रम आणि चांगल्या शक्तींनी वाईट शक्तींवर मिळवलेला विजय, म्हणजेच ‘ईश्वरी राज्या’च्या स्थापनेचा कालावधी दिलेला आहे.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. प्रस्तावना

गेल्या काही दशकांत संपूर्ण जग ‘नैसर्गिक आपत्ती, आतंकवादी कारवाया, युद्ध आणि राजकीय उलथापालथ’, अशा दुष्टचक्रांतून जात आहे. हे सर्व थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. एवढेच नव्हे, तर हे सर्व उणावतांनाही आढळत नाही. संपूर्ण जग एका अनिश्चित भविष्याकडे अनियंत्रितपणे ओढले जातांना पाहून कित्येकांच्या मनात असाहाय्यतेची भावना निर्माण होत आहे. नॉस्टॅ्रडॅमस, एडगर केयस यांसारख्या द्रष्ट्यांनी जगाचा भयंकर विनाश होण्याविषयीचे भविष्यकथन करून ठेवले आहे. ‘जगाला विनाशाच्या दरीत लोटणार्‍या घटनांमागे असणारी आध्यात्मिक कारणे’ आणि ‘संपूर्ण मानवजातीचे भविष्य’ यांविषयी ‘एस्.एस्.आर्.एफ्.’ने संशोधन केले. हे संशोधन प्रामुख्याने पुढील दोन सूत्रांवर आधारित असून या संशोधनातून लक्षात झालेली सूत्रे लेखातून मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

अ. तिसरे महायुद्ध आणि नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ होणे, यांसारख्या घटना जागतिक स्तरावर घडवून आणणार्‍या आध्यात्मिक शक्ती

आ. या घटनांचा प्रभाव न्यून करण्यासाठी किंवा तिसर्‍या महायुद्धाच्या वेळी स्वतःचे रक्षण करण्यासाठी अखिल मानवजातीने करावयाचे उपाय

श्री. शॉन क्लार्क

२. तिसर्‍या जागतिक महायुद्धाविषयी करण्यात आलेले भविष्यकथन आणि सूक्ष्मातील युद्ध

संपूर्ण विश्वात सूक्ष्मातील एक महायुद्ध चालू आहे; मात्र याविषयी बहुतांश लोकांना काहीही ठाऊक नाही. हे सूक्ष्मातील युद्ध चांगली शक्ती आणि वाईट शक्ती यांमधील आहे. सध्या पृथ्वीवर घडत असलेल्या काही घटना सूक्ष्मातील युद्धाचा दृश्य परिणाम आहे. या सूक्ष्मातील युद्धाचे परिणाम भविष्यात जगाची विविध स्तरांवर अत्यंत जलद गतीने घसरण होण्यासाठी बीजरूपात पेरलेले आहेत. हे परिणाम २ स्वरूपाचे आहेत.

अ. संपूर्ण जगाची सात्त्विकता न्यून होणे

आ. अखिल मानवजातीवर वाईट शक्तींचा प्रभाव वाढणे : वर्ष १९९३ पासून सूक्ष्मातील शक्तीशाली वाईट शक्तींनी समाजावर नियंत्रण मिळवून अधर्माचरणाला खतपाणी घातले आणि तेथूनच र्‍हासाला आरंभ झाला. तत्पूर्वी समाजातील रज-तम वाढल्याने विविध माध्यमांतून अधोगतीला आरंभ झालेलाच होता. याची प्रमुख कारणे ‘मनुष्याची मायेकडे असणारी ओढ आणि साधनेपासून लांब राहिल्याने निर्माण झालेला धर्माचरणाचा अभाव’, ही आहेत. सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींच्या प्रभावामुळे समाजाचा जलद आणि तीव्रतेने र्‍हास होत आहे. जसजसा समाज अधिकाधिक अधर्मी बनत आहे, तसतसे वाईट शक्तींनी समाजावर अधिकाधिक नियंत्रण मिळवले आणि परिणामस्वरूप वातावरणातील रज-तम अधिकच वाढत आहे. या रज-तमाच्या आधिक्यामुळे वातावरण आणि समाज अस्थिर होत आहे. ‘याची परिणती भयंकर नैसर्गिक आपत्ती आणि तिसरे महायुद्ध यांमध्ये होणार’, यात शंका नाही.

३. तिसर्‍या जागतिक महायुद्धाची तीव्रता

पृथ्वीवर स्थुलातून होणारे युद्ध हे सूक्ष्मातून घडणार्‍या घटनांचे परिणाम असतात. सूक्ष्मातील युद्धाला कारणीभूत असणारी मूळ कारणे केवळ सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असणार्‍या आध्यात्मिक दृष्टीने उन्नत जिवांनाच ज्ञात असतात. वास्तविक या सूक्ष्मातील युद्धाचा काहीसा अंशच पृथ्वीवर प्रत्यक्ष अनुभवता येईल; मात्र हा काहीसा अंशही जगाच्या दृष्टीने अत्यंत विनाशकारी आणि प्रचंड हानी करणारा असेल. हा काळ संपूर्ण मानवजातीला वाढत जाणार्‍या नैसर्गिक आपत्ती आणि तिसरे महायुद्ध यांच्या स्वरूपात भोगावा लागणार आहे. तिसर्‍या महायुद्धात वापरल्या जाणार्‍या आण्विक शस्त्रांमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे. अधर्माचरणात वाढ झाल्यामुळे पृथ्वीची सात्त्विकता लयाला गेली आहे; परिणामी पूर, भूकंप आणि ज्वालामुखी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ होत आहे. सप्तपाताळांतील मोठ्या वाईट शक्तींच्या नियंत्रणात असणारे लोक आणि त्यामुळे घडणारे प्रसंग जगाला तिसर्‍या महायुद्धाच्या खाईत लोटणार आहेत.

३ अ. स्थुलातील आणि सूक्ष्मातील युद्धाची तीव्रता : स्थुलातील आणि सूक्ष्मातील पैलूंच्या आधारे जागतिक महायुद्धांच्या तीव्रतेचा केलेला तुलनात्मक अभ्यास पुढे दिला आहे.

तिसर्‍या जागतिक महायुद्धात होणारी हानी पहिल्या महायुद्धाच्या तुलनेत साडेचार पट आणि दुसर्‍या महायुद्धाच्या तुलनेत तिपटीने अधिक असेल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

यावरून सूक्ष्मातील युद्ध आणि तिसरे जागतिक महायुद्ध यांच्यातील परस्परसंबंधाची साधारण कल्पना येते. गेल्या काही वर्षांत जगावर आलेली मोठी संकटे आणि आतंकवादी आक्रमणे ही या सूक्ष्मातील युद्धाशी संबंधित आहेत. पाताळातील मोठ्या वाईट शक्ती, वाईट मनोवृत्ती असणार्‍या लोकांवर नियंत्रण मिळवून त्यांच्याकडून वाईट कृत्ये करवून घेतात आणि समाजाला हानी पोचवतात.

४. तिसरे महायुद्ध आणि सूक्ष्मातील युद्ध यांतील प्रमुख टप्पे

४ अ. तिसर्‍या जागतिक महायुद्धाला कारणीभूत घटक : तिसर्‍या महायुद्धाचा आरंभ सूक्ष्मातील वाईट शक्तींमुळे होणार आहे. मोठ्या वाईट शक्ती समाजाच्या धार्मिक संवेदनशीलतेचा अपलाभ उठवून समाजाला टोकाची पावले उचलण्यास भाग पाडतील आणि त्यामुळे जगातील काही राष्ट्रे एकमेकांच्या विरुद्ध उभी रहातील. तिन्ही जागतिक महायुद्धे होण्यामागे सप्तपाताळांपैकी सर्वांत खालच्या पाताळांत असणार्‍या मोठ्या वाईट शक्ती कारणीभूत आहेत, ज्यांनी देशांना परस्परांविरुद्ध युद्ध करण्यास प्रवृत्त केले आणि आता तिसर्‍या महायुद्धासाठी प्रवृत्त करत आहेत. ‘ही युद्धे घडवून आणण्यात सप्तपाताळांतील कोणत्या वाईट शक्ती कार्यरत होत्या आणि आहेत ?’, हे पुढील सूत्रांवरून लक्षात येईल.

४ अ १. पहिले जागतिक महायुद्ध : दुसर्‍या पाताळातील वाईट शक्ती

४ अ २. दुसरे जागतिक महायुद्ध : दुसरे महायुद्ध घडवून आणण्यात तिसर्‍या पाताळातील वाईट शक्तींचा मोठा सहभाग होता. याचे उदाहरण म्हणून हिटलरकडे पहाता येईल. हिटलरच्या संपूर्ण राजवटीच्या काळात तो पाचव्या पाताळातील वाईट शक्तींच्या नियंत्रणात होता. त्यामुळे अत्यंत नाट्यमय रितीने तो सत्ता मिळवू शकला, तसेच त्याच्या संपूर्ण कारकीर्दीवर वाईट शक्तीचा प्रभाव होता.

४ अ ३. तिसरे जागतिक महायुद्ध : तिसरे जागतिक महायुद्ध प्रत्यक्ष घडवून आणण्यात चौथ्या पाताळातील वाईट शक्ती कारणीभूत असतील; मात्र सूक्ष्मातील युद्धात सातव्या पाताळातील वाईट शक्ती सहभागी असतील. वर्ष २०१७ ते वर्ष २०२४ या कालावधीत होणार्‍या सूक्ष्मातील युद्धात सहाव्या आणि सातव्या पाताळांतील वाईट शक्तींचा सहभाग असेल.

तिसर्‍या जागतिक महायुद्धाचा सूक्ष्मातून आरंभ वर्ष २०१५ मध्ये होऊन ते पुढे ९ वर्षे, म्हणजे वर्ष २०२४ पर्यंत चालेल. या कालावधीत होणारी युद्धे ही याच जागतिक महायुद्धाशी संबंधित असतील; मात्र जगाला त्याची जाणीव होणार नाही. या कालावधीच्या शेवटी प्रचंड मोठ्या प्रमाणात हानी करणार्‍या आण्विक शस्त्रांचा वापर केला जाईल. त्यामुळे अपरिमित मनुष्यहानी होऊन जगाची ५० टक्के लोकसंख्या नष्ट होईल. या युद्धामुळे जगातील काही देशांची इतर देशांपेक्षा अधिक हानी होईल; मात्र सर्व जग परस्परांशी जोडलेले असल्याने सर्वच देशांची हानी होणार आहे.

(क्रमशः पुढच्या रविवारी)

(हा लेख http://ssrf.org/ww3 या लिंकवर उपलब्ध आहे.)   (पूर्वार्ध)

– श्री. शॉन क्लार्क (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), संपादक, एस्.एस्.आर्.एफ्. आणि संशोधन विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (वर्ष २०१६)