श्रीगोंदा (जिल्हा नगर) येथे स्वस्त धान्याचा काळाबाजार !
जिल्ह्यातील पथक येऊन अनियमितता शोधत असतांना स्थानिक पुरवठा निरीक्षक नेमके काय करतात ? ते प्रतिमास कोणत्या दुकानांना भेटी देतात, याची चौकशी वरिष्ठ अधिकारी करत नाहीत का ? असे कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? – संपादक
श्रीगोंदा (जिल्हा नगर) – राज्यात स्वस्त धान्य दुकानांमधील धान्याची अफरातफर रोखण्यासाठी शासनाने ‘ई-पॉस’ यंत्रावर शिधापत्रिकाधारकांचे अंगठ्याचे ठसे नोंदवणे सक्तीचे केले आहे. असे असतांना येथील काही दुकानदारांकडून शिधापत्रिकाधारकांचे ‘ई-पॉस’ यंत्रावर अगोदरच अंगठ्याचे ठसे नोंदवून धान्य नंतर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे, तसेच ‘ई-पॉस’ यंत्रावर मागील मासाच्या अंगठ्याच्या ठशांची नोंद घेण्याची सोय नाही, असे कारण देऊन धान्य पुरवठाही होण्यास विलंब लागणार असल्याचे कारण सांगून दुकानदार अगोदरच अंगठ्याच्या ठशांची नोंदणी घेऊन ठेवतात. तथापि त्यांना धान्य वितरण न करता स्वस्त धान्याचा काळाबाजार करत असल्याचे ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ मध्ये पुरवठा विभागाच्या विशेष पथकाने केलेल्या ११५ स्वस्त धान्याच्या दुकानांच्या पडताळणीमध्ये निदर्शनास आले आहे.
या अनियमिततेविषयी नगर जिल्हा पुरवठा अधिकार्यांकडून चौकशी चालू असून या चौकशीमध्ये आढळणार्या दोषांच्या अनुषंगाने संबंधित रास्त भाव दुकानदारांवर कारवाई चालू आहे, अशी माहिती प्रशासनाने लेखी उत्तरात दिली आहे. थोडक्यात स्वस्त धान्य दुकानांतून गरिबांना मिळणार्या धान्याचा मोठा काळाबाजार चालू आहे. दुकानदार, पुरवठा विभाग आणि दलाल यांच्या सराईतपणे संगनमताने होणारा हा काळाबाजार गरिबांची लूट करत आहे.