सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील ‘मे. क्लरस बायो एनर्जी प्रा.लि.’ आस्थापनाची पहाणी करून त्रुटी दुरुस्त करण्याचे आदेश ! – आदित्य ठाकरे, पर्यावरणमंत्री

विधानसभा कामकाज तारांकित प्रश्न

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

मुंबई, ५ मार्च (वार्ता.) – सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील महाराष्ट्र औद्योगिक महामंडळातील ‘मे. क्लरस बायो एनर्जी प्रा.लि.’ या आस्थापनातून सोडण्यात येणारे सांडपाणी आणि इतर टाकाऊ पदार्थ यांमुळे आसपासच्या गावांमध्ये प्रदूषण होत आहे. या प्रकरणी येथील नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडे तक्रार करूनही कोणतीच कार्यवाही न झाल्याने तेथील नागरिक आंदोलन करत आहेत, तरी या प्रकरणी कोणती कारवाई करण्यात आली ? असा प्रश्न शिराळा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मानसिंग नाईक यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता. त्यावर ‘मे. क्लरर्स बायो एनर्जी प्रा.लि.’ आस्थापनाची पहाणी करून त्रुटी दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे लेखी उत्तर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.

या संदर्भात दिलेल्या लेखी उत्तरात पुढे म्हटले आहे की, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे या आस्थापनाच्या विरोधात यापूर्वी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार या आस्थापनास १७ ऑगस्ट २०२० मध्ये उत्पादन बंदचे आदेश देण्यात आले होते. नंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अटी आणि शर्ती यांच्या अधिन राहून सदर आस्थापनास १० डिसेंबर २०२१ मध्ये उत्पादन चालू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानंतर परत एकदा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने १४ फेब्रुवारी २०२२ ला  पहाणी करून त्रुटी दुरुस्त करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.