परात्पर गुरु डॉ. आठवले यांना वेदना झाल्यावर ते ‘आई गं’ ऐवजी प.पू. भक्तराज महाराज यांना उद्देशून ‘बाबा हो’ असे न म्हणण्यामागील अध्यात्मशास्त्र !
डॉ. आठवले : वेदना झाल्यावर मी ‘आई गं’ म्हणण्याऐवजी प.पू. भक्तराज महाराज यांना उद्देशून ‘बाबा हो’ असे का म्हणत नाही ?
उत्तर : ‘सामान्य मनुष्य जागृती आणि स्वप्न या अवस्था अनुभवत असतो. साधक जागृती आणि स्वप्न या अवस्थांसह सुषुप्ती अवस्थाही अनुभवत असतात. संतांची जागृती आणि स्वप्न अवस्था अल्प काळासाठी असते. ते सुषुप्ती आणि तुर्या या अवस्थेत असतात. सद्गुरु अधिकाधिक तुर्यावस्थेत असतात. अवतारी पुरुष ‘तुर्यातीत’ म्हणजे, ‘उन्मनी’ अवस्थेत असतात. परात्पर गुरु डॉ. आठवले हे अवतारी पुरुष असल्यामुळे ते ‘तुर्यातीत’ म्हणजे, ‘उन्मनी’ अवस्थेत असतात. या अवस्थेत त्यांना स्वत:च्या देहाचे भान नसते, म्हणजे ते ‘देहातीत अवस्था’ अनुभवत असतात. उन्मनी अवस्थेत भगवंताशी अद्वैत असल्यामुळे जेव्हा त्यांना वेदना होतात, तेव्हा त्यांनी समष्टीचे म्हणजे, समस्त साधकांना होणारे वाईट शक्तींचे त्रास स्वत:वर घेतलेले असतात. हे समष्टी त्रास सोसत असतांना जेव्हा त्यांना वेदना होते, तेव्हा ते प.पू. भक्तराज महाराज यांना उद्देशून ‘बाबा हो’ असे म्हणत नाहीत; कारण या अवस्थेत त्यांचे त्यांच्या गुरूंशी अद्वैत झालेले असते. जेव्हा त्यांच्या देहाला वेदना होतात, तेव्हा ते उन्मनी अवस्थेतच असतात. या अवस्थेत ते सर्व सामान्य मनुष्याप्रमाणे ‘आई गं’, असे म्हणत असल्याचे वाटत असले, तरीही ते तसे नसते. ‘परात्पर गुरुदेव सर्वसामान्य मनुष्य असल्याप्रमाणे वागून ते सामान्य आहेत’, हे दर्शवण्याचा प्रयत्न करतात. ही त्यांची ‘अहंशून्य’ स्थिती आहे. अशा प्रकारे परात्पर गुरु डॉ. आठवले जेव्हा उन्मनी अवस्थेत असतात, तेव्हा ते भगवंत स्वरूप असतात आणि जेव्हा ते भक्त स्वरूप असतात, तेव्हा ते वेदना झाल्यावर ‘आई गं’ असे म्हणतात. त्यांच्या भक्तीमुळे या स्थितीतही ते त्यांच्या भौतिक जगातील मातेला उद्देशून नव्हे, तर संपूर्ण विश्वाचे पालन करणार्या जगद्जननी देवीला उद्देशून ‘आई गं’ म्हणतात, असे जाणवते. त्यामुळे जगद्जननी माता परात्पर गुरुदेवांच्या या हाकेला धावून पृथ्वीवर येते आणि ती साधकांच्या रक्षणासाठी त्यांना त्रास देणार्या वाईट शक्तींचा संहार करते. त्यामुळे साधकांचा आध्यात्मिक त्रास न्यून होऊन त्यांना बरे वाटते. ते पाहून परात्पर गुरुदेवांना आनंद होतो.’ – कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.१०.२०२१)