युक्रेनचा आकाशमार्ग ‘निषिद्ध क्षेत्र’ (नो फ्लाय झोन) घोषित करण्यास ‘नाटो’चा नकार !

यापुढे होणार्‍या मृत्यूंना ‘नाटो’ उत्तरदायी असल्याची युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची टीका

‘नाटो’चे सरचिटणीस जेन्स स्टॉल्टनबर्ग

कीव (युक्रेन) – युक्रेनचा आकाशमार्ग ‘निषिद्ध क्षेत्र’ (नो फ्लाय झोन) घोषित करण्यास किंवा त्यावर देखरेख ठेवण्यास ‘नाटो’ने नकार दिला आहे. यावरून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी ‘नॉर्थ अ‍ॅटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेन’वर (‘नाटो’वर) कठोर शब्दांत टीका केली आहे. ‘यापुढे ज्या लोकांचा मृत्यू होईल, त्याला तुम्हीसुद्धा उत्तरदायी असाल. तुमच्या नेतृत्वामुळे, तसेच तुमच्यामध्ये निर्णय घेण्याइतकी एकता नसल्यामुळे या मृत्यूंसाठी तुम्हालाच उत्तरदायी धरावे लागेल’, अशी टीका झेलेंस्की यांनी केली. ‘नाटो’ने युक्रेनला ‘नो फ्लाय झोन’ घोषित न केल्याने रशियाकडून युक्रेनवर आकाशमार्गाने करण्यात येणार्‍या आक्रमणांत वाढ होईल. ‘नोटो’ने बाँबद्वारे आक्रमण करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे’, अशी टीका झेलेंस्की यांनी केली.

१. ‘नाटो’चे सरचिटणीस जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी स्वतच्या निर्णयाचे समर्थन करतांना म्हटले की, युक्रेनचा आकाशमार्ग ‘नो फ्लाय झोन’ घोषित केल्यास त्याची परिणती युरोपात अण्वस्त्रसज्ज रशियाशी युद्ध भडकण्यात होऊ शकते. आम्ही ना युक्रेनमध्ये प्रवेश करणार, ना भूमीवर ना आकाश क्षेत्रात.

२. जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी आरोप केला की, रशिया ‘क्लस्टर’ बाँबचा वापर करत असल्याचे आम्ही पाहिले आहे. रशियाच्या या कृतीमुळे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन होत आहे.