केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह पुत्र नितेश राणे यांना न्यायालयाचा दिलासा
मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे आमदार पुत्र नितेश राणे यांना १० मार्चपर्यंत अटक करू नये, असा आदेश दिंडोशी न्यायालयाने दिला आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात वादग्रस्त विधान केल्यामुळे या दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या सुनावणीत न्यायालयाने वरील निर्णय दिला आहे.
दिशाच्या आत्महत्येनंतर राणे पिता-पुत्राकडून दिशाच्या आत्महत्येविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, तसेच तिच्याविषयी अनेकदा आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान केले होते. दिशाची आई वासंती सालियन यांनी मालवणी पोलिसांत राणे पिता-पुत्र यांच्याविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्ध मालवणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. या गुन्ह्याच्या चौकशीसह जबाब नोंदवण्यासाठी राणे यांना नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिसीच्या विरोधात राणे यांनी दिंडोशी न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी याचिका प्रविष्ट केली होती. यावर ४ मार्च या दिवशी सुनावणी करतांना न्यायालयाने त्यांना तात्पुरता दिलासा दिला आहे.