प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींवर बंदी घाला !
सातारा येथील समस्त कुंभार समाजाची मागणी
सरकारने शाडू मातीच्या श्री गणेशमूर्तींचा अध्यात्मशास्त्रीय लाभ लक्षात घेऊन निर्णय घ्यावा ! – संपादक
सातारा, ४ मार्च (वार्ता.) – प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींमुळे कुंभार समाजाची कला लोप पावत आहे. तरुणांना मातीची पारंपरिक कला अवगत असतांनाही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींमुळे कुंभार समाजाला योग्य मोबदला मिळत नाही. यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी सातारा येथील कुंभार समाजाच्या वतीने मारुतराव कुंभार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. (प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्याची मागणी का करावी लागते ? प्रशासनाच्या ते लक्षात येत नाही का ? – संपादक)
मारुतराव कुंभार पुढे म्हणाले की, प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या सर्वच वस्तू केवळ शोभेच्या वस्तू म्हणून विकता येतील; मात्र कोणतीही मूर्ती पूजेसाठी विकता येणार नाही. उच्च न्यायालयाचे तसे आदेश असतांनाही त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे कुंभार समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. गतवर्षीपासून नागपूर, संभाजीनगर (औरंगाबाद), मुंबई आदी ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या सर्व देवतांच्या मूर्तींवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातही जिल्हा प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा कुंभार आंदोलन करेल, तसेच नदी पात्रातील आणि तलावातील गाळ शाडू मातीच्या मूर्तीकारांना उपयोगात आणण्यास अनुमती द्यावी.