सौराष्ट्रामधून आलेल्या वार्‍यामुळे हवेत सूक्ष्म धुलीकणांचे प्रमाण वाढले ! – आदित्य ठाकरे, पर्यावरणमंत्री

आदित्य ठाकरे, पर्यावरणमंत्री

मुंबई, ४ मार्च (वार्ता.) – सौराष्ट्रामधून आलेल्या वार्‍यामुळे हवेत सूक्ष्म धुलीकणांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रदूषणाची पातळी वाढली असल्याचे जानेवारी २०२२ मध्ये निदर्शनास आले आहे, अशी माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ४ मार्च या दिवशी विधानसभेत लेखी प्रश्नोत्तरात दिली आहे.

शिवाजीनगर (पुणे) येथील आमदार सिद्धार्थ शिरोळे यांसह इतर आमदारांनी ४ मार्च या दिवशी राज्यातील ‘सी.एस्.ई’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये महाराष्ट्रातील प्रदूषणाची पातळी वाढत असल्याविषयीचा प्रश्न विचारला होता.

मंत्री आदित्य ठाकरे यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे की, हिवाळ्याच्या दिवसात हवेतील प्रदूषकांची पातळी अधिक असते. हिवाळ्यात हवेच्या अल्प तापमानामुळे, वेगवान वार्‍याच्या अभावाने भूमीलगतची प्रदूषके ही उंच हवेत मिसळ्याचे प्रमाण अल्प होते. इतर वेळी हवा गुणवत्ता निर्देशांक मुंबई येथील सर्व भागांत समाधानकारक ते मध्यम प्रमाणात आढळतो. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई शहरासाठी हवा प्रदूषण नियंत्रणासाठी कृती आराखड्याचा मसुदा सिद्ध केला असून तो संमत झाला आहे. त्याची कार्यवाही चालू आहे.