पेपरफुटीचे अन्वेषण पूर्ण झाल्यानंतर भरतीप्रकियेची पुढील कार्यवाही करणार ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री
राज्यात आरोग्य विभागातील २९ सहस्र ९६८ पदे रिक्त !
आरोग्यासारख्या संवेदनशील क्षेत्रातील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असणे आणि अनेक मासांपासून भरती प्रक्रिया रेंगाळणे हे शासनकर्त्यांसाठी शोभनीय नाही ! – संपादक
मुंबई, ४ मार्च (वार्ता.) – सार्वजनिक आरोग्य विभागातील नियमितची १७ सहस्र ६६२, तर कंत्राटी १२ सहस्र ३०६ अशी २९ सहस्र ९६८ पदे रिक्त आहेत. आरोग्य विभागातील पदांच्या भरतीप्रक्रियेत झालेल्या पेपरफुटीच्या चौकशीचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यावर भरतीप्रक्रियेची पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या भरतीविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांसह अन्य काही आमदारांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला ४ मार्चला दिलेल्या लेखी उत्तरात राजेश टोपे यांनी वरील माहिती दिली आहे.
या उत्तरामध्ये राजेश टोपे यांनी म्हटले आहे की, पेपरफुटीच्या प्रकरणात पोलिसांकडून प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार आरोपींवर खटला प्रविष्ट करण्याची कार्यवाही चालू आहे. ‘अ’ गटातील १ सहस्र ७९५, ‘ब’ गटातील ९९६, तर ‘क’ गटातील ९ सहस्र ३४२ इतक्या जागा रिक्त आहेत. पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे विज्ञापन प्रसिद्ध करण्यात आली आहेत.