सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राजकीय कुरघोडींमुळे विधीमंडळातील प्रश्नोत्तराच्या कामकाजाचा वेळ वाया !
जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असलेला सभागृहाचा वेळ वाया घालवणे, ही लोकशाहीची शोकांतिकाच होय ! – संपादक
मुंबई, ४ मार्च (वार्ता.) – विधानसभा आणि विधान परिषद यांमध्ये इतर मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणावरून विरोधकांनी गोंधळ घातला. यामुळे ४ मार्च या दिवशी दोन्ही सभागृहांत महत्त्वाच्या लक्षवेधी सूचना, तसेच तारांकित प्रश्न यांवर चर्चा होऊ शकली नाही. या गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
इतर मागासवर्गीय आरक्षणाविषयी ७ मार्च या दिवशी चर्चा होईल, असे सत्ताधारी पक्षाने घोषित करूनही विरोधकांनी विरोध चालूच ठेवला. यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. सकाळी ११ वाजता विधानसभेचे, तर दुपारी १२ वाजता विधान परिषदेचे कामकाज चालू झाले; मात्र सभागृह चालू झाल्यावर दोन्ही सभागृहांत विरोधकांनी इतर मागासवर्गीय आरक्षणाचा प्रश्न उपस्थित करून सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यामुळे विधानसभेचे कामकाज दोनदा ४५ मिनिटांसाठी, तर विधान परिषदेचे एकदा २० मिनिटांसाठी स्थागित करावे लागले. त्यानंतरही गोंधळ चालू राहिल्याने दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. यामध्ये विधान परिषदेचे कामकाज केवळ ३० मिनिटे, तर विधानसभेचे कामकाज केवळ ४५ मिनिटे आणि तेही गोंधळाच्या वातावरणात झाले. दोन्ही सभागृहांत गोंधळात प्रत्येकी एका तारांकित प्रश्नावर चर्चा झाली. सभागृहातील गोंधळामुळे लक्षवेधी सूचनेवरील चर्चाही रहित करण्यात आली. त्यामुळे शेतकर्यांच्या कृषीपंपांची वीज तोडणी, कृषीविषयक चर्चा, ‘औरंगाबाद’ शहराचे नामकरण ‘संभाजीनगर’ करणे आदी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होऊ शकली नाही.