कुलभूषण जाधव यांच्यासाठी अधिवक्ता नियुक्त करण्याची भारताला संधी द्यावी ! – इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे पाकिस्तान सरकारला निर्देश

पाकिस्तानच्या अटकेत असलेले निवृत्त भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव

इस्लामाबाद (पाकिस्तान) – आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानुसार कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यासाठी १३ एप्रिल २०२२ पर्यंत एखादा अधिवक्ता नियुक्त करण्यासाठी भारताला आणखी एक संधी द्यावी, असे निर्देश इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पाकिस्तान सरकारला दिले. यामुळे पाकिस्तानी सैनिकी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना न्यायालयासमोर ‘पाककडून दोषी ठरवण्याच्या आणि शिक्षा सुनावण्याच्या विरुद्ध म्हणणे मांडणे शक्य होणार आहे. पाकच्या सैन्य न्यायालयाने ५१ वर्षीय निवृत्त भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यावर हेरगिरी आणि आतंकवादाचा आरोप करत  एप्रिल २०१७ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती.

यानंतर जाधव ‘कॉन्स्युलर ऍक्सेस’ (कायदेशीर साहाय्य) न दिल्यावरून भारताने पाकिस्तानच्या विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. त्यावर जुलै २०१९ मध्ये या न्यायालयाने निर्णय देतांना ‘जाधव यांना भारताकडून कायदेशीर साहाय्य देण्यात यावे’, असा आदेश दिला होता. यासह जाधव यांच्या शिक्षेचे पुनरावलोकन सुनिश्‍चित करण्याचेही निर्देश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकला दिले होते.