युक्रेनमध्ये असलेल्या युरोपमधील सर्वांत मोठ्या अणूऊर्जा केंद्रावर रशियाचे नियंत्रण

रशियाच्या गोळीबारामुळे लागली भीषण आग !

अणूऊर्जा केंद्र

झापोरिझ्झिया ओब्लास्ट (युक्रेन) – येथील नीपर नदीच्या किनारी असलेल्या युक्रेनच्या अणूऊर्जा केंद्रावर रशियाने आक्रमण करून ते स्वतःच्या नियंत्रणात घेतले आहे. हे केंद्र युरोपमधील सर्वांत मोठे, तर पृथ्वीवरील ९ व्या क्रमांकाचे अणूऊर्जा केंद्र आहे. या अणूऊर्जा प्रकल्पातून युक्रेनला ४० टक्के अणुऊर्जेचा पुरवठा होतो. येथे ६ अणूभट्ट्या आहेत.

या केंद्राच्या प्रवक्त्याने सांगितले की, या केंद्रावर रशियाच्या सैन्याने ४ मार्चच्या पहाटे गोळीबार केला. यामुळे या केंद्राला आग लागली. त्यानंतर रशियाने यावर केंद्रावर नियंत्रण मिळवले. रशियन सैन्याने येथे लागलेली आग विझवली आहे. या आगीचा व्हिडिओ युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी इन्स्टाग्रामवर प्रसारित केला आहे.

…तर तो युरोपचा शेवट असेल ! – युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची चेतावणी

जर या अणुऊर्जा केंद्रात स्फोट झाला, तर तो युरोपचा शेवट असेल. संपूर्ण युरोप रिकामा करावा लागेल. युरोपने तातडीने यासंदर्भात पावले उचलली, तरच रशियन सैन्य थांबेल. एका अणुऊर्जा प्रकल्पावरील स्फोटाद्वारे युरोपचा मृत्यू होऊ देऊ नका, अशी चेतावणी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी दिली.

झेलेंस्की पुढे म्हणाले, ‘‘रशियाखेरीज आजपर्यंत अन्य कोणत्याही देशाने  अणूऊर्जा केंद्रावर कधीही गोळीबार केलेला नाही. हे आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच घडले आहे. या आतंकवादी देशाने आता ‘अणू आतंकवादा’चा अवलंब केला आहे. रशिया चेर्नोबिलची पुनरावृत्ती करू इच्छित आहे.’’ चेर्नोबिल येथील अणूऊर्जा प्रकल्पामध्ये वर्ष १९८६ मध्ये किरणोत्सर्ग होऊन सहस्रो लोकांचा मृत्यू झाला होता.

युक्रेननेच लावली आग ! – रशियाचा दावा

आमच्या आक्रमणापूर्वीच युक्रेनच्या एका गटाने अणूऊर्जा केंद्रावर गोळीबार करून तेथे आग लावली, असा आरोप रशियाने केला आहे.

आमच्याशी चर्चा करा ! – झेलेंस्की यांचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना आवाहन

आम्ही रशियावर आक्रमण केलेले नाही. आम्ही आक्रमण करण्याची योजनाही बनवत नाही. तुम्हाला आमच्याकडून काय हवे आहे ? आमच्या भूमीवरील नियंत्रण सोडा. माझ्यासमवेत बसा. आपण अगदी एकमेकांपासून ३० मीटरवर (जसे तुम्ही फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँन यांच्यासमवेत बसला होता तसे) बसून बोलूया, असे आवाहन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना केले आहे.

 …तर आम्हाला विमाने द्या ! – झेलेंस्की यांची युरोपीय देशांकडे मागणी

तुम्हाला आकाशात उड्डाण करणार्‍या विमानांवर बंदी घालता येत नसेल, तर मला विमाने द्या, अशी मागणी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी युरोपीय देशांकडे केली. आम्ही राहिलो नाही तर लातविया, लुथेनिया आणि इस्टोनिया या देशांना लक्ष्य केले जाईल.

आमच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्याने युक्रेनवर कारवाई ! – रशिया

पाश्‍चात्त्य देशांनी कायम युक्रेनला शस्त्रपुरवठा केला आहे. त्याच्या सैनिकांना प्रशिक्षण दिले आहे, तसेच युक्रेनचे रूपांतर रशियाविरोधी तटबंदी करण्यासाठी तेथे तळ बांधले आहे. यामुळे आमच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्यामुळेच आम्हाला युक्रेनवर कारवाई करणे भाग पडले, असा दावा रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लवरोव्ह यांनी केला.