नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी भाजपचे पुन्हा विधीमंडळाच्या पायर्यांवर आंदोलन !
नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी भाजपकडून फलकावर स्वाक्षरी मोहीम !
मुंबई, ३ मार्च (वार्ता.) – देशद्रोह्यांशी आर्थिक व्यवहार करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी त्यागपत्र देण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी विधीमंडळाच्या पायर्यावर ४ मार्च या दिवशी सकाळी १०.३० वाजता आंदोलन केले. या वेळी विरोधकांनी ‘नवाब मलिक यांना पाठीशी घालणार्यांचा सरकारचा धिक्कार असो’, ‘नवाब मलिक हाय हाय; खुनी है, खुनी है नवाब मलिक खुनी है’, अशा घोषणा दिल्या. आंदोलनाच्या वेळी विरोधकांनी नवाब मलिक आणि महाविकास आघाडी सरकार यांच्या विरोधातील फलक हातात घेतले होते. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रवक्ते आणि अधिवक्ता आशिष शेलार यांसह भाजपचे सर्व आमदार या आंदोलनात सहभागी झाले होते.
सौजन्य झी २४ तास
नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी भाजपची स्वाक्षरी मोहीम !
या वेळी नवाब मलिक यांनी त्यागपत्र देण्यासाठी भाजपच्या आमदारांनी ‘देशद्रोह्यांशी आर्थिक व्यवहार करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी त्यागपत्र देण्याच्या मागणीसाठी विधीमंडळ सदस्यांची स्वाक्षरी’ अशा आशयाचा एक फलक सिद्ध केला होता. हा फलक आंदोलनाच्या ठिकाणी लावला होता. या फलकावर भाजपच्या आमदारांनी स्वाक्षरी केल्या. दुसरीकडे विधीमंडळात येत असतांना भाजपच्या काही आमदारांनी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनाही या फलकावर स्वाक्षरी करण्यास सांगून त्यांच्या हातात पेन देण्याचा प्रयत्न केला; मात्र चव्हाण यांनी पेन घेण्यास आणि स्वाक्षरी करण्यास नकार दिला !