बिहारमधील ३८ पैकी ३१ जिल्ह्यांतील पाणी पिण्यायोग्य नाही !
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत जनतेला साधे पिण्याचे पाणीही देऊ न शकणे, हेे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
पाटलीपुत्र (बिहार) – बिहारच्या विधासनभेमध्ये ‘भूजलाची पातळी आणि गुणवत्ता’ याविषयीचा एक अहवाल नुकताच सादर करण्यात आला. यात राज्यातील ३८ पैकी ३१ जिल्ह्यांतील पाणी पिण्यायोग्य नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पाण्यामध्ये ‘आर्सेनिक’, ‘फ्लोराईड’ आणि ‘आयर्न’ यांचे अतिरिक्त प्रमाण आढळले आहे. या जिल्ह्यांमध्ये बिहारची राजधानी पाटलीपुत्रासह बेगूसराय, भागलपूर, भोजपूर, बक्सर, दरभंगा, कटिहार, खगडिया, लखीसराय, मुंगेर, समस्तीपूर, सारण, सीतामढी, वैशाली, औरंगाबाद, बांका, भागलपूर, गया, जमुई, कैमूर, मुंगेर, नालंदा, रोहतास, शेखपुरा, नवादा, अररिया आदी जिल्ह्यांचा समावेश आहे.
या अहवालात पुढे म्हटले आहे की, अनेक भागांतील पाण्यामध्ये विषारी तत्त्वे आढळली आहेत. जवळपास ३० सहस्र २७२ ग्रामीण भागांतील भूजल रासायनिक पदार्थांमुळे प्रदूषित झाले आहे. गंगा नदीच्या किनार्यावरील १४ जिल्ह्यांतील एकूण ४ सहस्र ७४२ ग्रामीण प्रभागांमध्ये ‘आर्सेनिक’युक्त पाणी आढळले असून ११ जिल्ह्यांतील ३ सहस्र ७९१ ग्रामीण प्रभागांतील पाणी ‘फ्लोराईड’मुळे प्रदूषित झाले आहे. काही जिल्ह्यांतील पाण्यामध्ये अतिरिक्त प्रमाणात ‘आयर्न’ आढळू आले आहे. दूषित पाण्यामुळे त्वचाविकार, मूत्रपिंड आणि अन्य विधी जडू शकतात.