पनवेल येथील लिमये वाचनालयात ‘मराठी राजभाषादिन’ साजरा !
सनातन संस्थेचा सहभाग !
पनवेल – येथील लिमये वाचनालय येथे ‘मराठी राजभाषादिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये सनातन संस्थेच्या वतीने श्री. योगेश ठाकूर यांनी ‘मराठी राजभाषादिनाचे महत्त्व’ या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्यान दिले. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षा श्रीमती सुनीता जोशी, उपाध्यक्ष श्री. श्याम वालावलकर, कार्यवाहक श्री. विनायक वत्सराज, कार्यवाहक श्री. काशिनाथ जाधव, सहकार्यवाहक सौ. जयश्री शेटे, तसेच वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते. या व्याख्यानाचा लाभ वाचनालयाच्या अनेक जिज्ञासू वाचकांनी घेतला.
१. श्री. ठाकूर मराठी भाषेच्या सद्य:स्थितीविषयी म्हणाले, ‘‘या भाषेवर अनेक आक्रमणे झाली आहेत. वर्ष १८३५ नंतर आपली मराठी भाषा दुय्यम स्थानावर गेली. आपल्या दैनंदिन जीवनात परकीय शब्दांचा सहजतेने वापर केला जातो. नव्या पिढीस मराठी बोलतांना घरीदारी सहजासहजी इंग्रजी शब्द वापरण्याची घातक खोड लागली आहे. आज आपल्या स्वयंपाकातील सर्व क्रिया आणि त्याकरिता लागणारी सगळी साधने यांचे इंग्रजीकरण झाले आहे.’’
२. मराठी भाषेच्या शुद्धतेविषयी संभ्रम निर्माण झालेला आहे. इंग्रजीकडे सगळ्यांचा ओढा असतो. इंग्रजी लिहिता-बोलता आले, तर त्याचे भवितव्य घडते आणि प्रभाव पडतो; अन् तसे झाले नाही, तर याचा आत्मविश्वासावर परिणाम होतो. असे सर्व चुकीचे चित्र निर्माण झाले आहे. इंग्रजीच्या अतीवापरामुळे भारतियांमध्ये स्वभाषेविषयीचा न्यूनगंड निर्माण झाला. इंग्रजी ही व्यापारी भाषा असल्याने ‘ती जगाची भाषा आहे’, असे आपल्यावर लादले गेले आहे.
३. ठाकूर यांनी मराठी शब्दांचा अधिकाधिक वापर करण्यासाठी काय करावे ? ते सांगितले, तसेच इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द सांगितले. मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात ? याविषयी त्यांनी अगदी सविस्तरपणे विवेचन या व्याख्यानामध्ये केले.
४. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यवाहक श्री. काशिनाथ जाधव यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कुलकर्णी यांनी केले.
वाचकांचा प्रतिसाद !
१. व्याख्यान पुष्कळ छान झाले आणि आज मराठी भाषेचे संवर्धन ही काळाची आवश्यकता आहे.
२. ‘सनातन संस्थेने प्रकाशित केलेले ग्रंथ आम्हाला हवे आहेत’, असे काही वाचकांनी सांगितले.