६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) कला खेडेकर (वय ५३ वर्षे) यांची श्री. सोहम् नीलेश सिंगबाळ यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

सुश्री (कु.) कला खेडेकर

१. अंगी कलागुण असणे

१ अ. शिवण : ‘सुश्री (कु.) कलाताई हिच्यामध्ये तिच्या नावाप्रमाणेच काही कला आहेत. कलाताईची शिवणकला फार चांगली आहे. पोशाख बनवल्यावर त्यांचे शिल्लक राहिलेले छोटे छोटे कापडाचे तुकडे जोडून तिने उशीचे अभ्रे, पायपोस आणि पलंगपोस बनवले आहेत. तिने जुन्या साड्या, चादरी आणि ओढण्या यांपासून गोधड्याही शिवल्या आहेत. एका जुन्या ओढणीपासून तिने मला माझ्या सायकलसाठी छान आच्छादन (कव्हर) शिवून दिले होते.

१ आ. पाककलेत निपुणता : कलाताई पाककलेत निपुण आहे. स्वयंपाक बनवतांना ‘पदार्थ रुचकर आणि परिपूर्ण बनवणे’, हा तिचा गुण आहे. घरी कुणी नातेवाईक आले, तर कलाताई नातेवाइकांच्या आवडीचे पदार्थही प्रेमाने आणि आवर्जून करते.

२. प्रेमभाव

कलाताई लहान मुलांशी लगेच जवळीक साधते. त्यामुळे लहान मुले तिच्याकडे लगेच आकर्षित होतात आणि तिच्याशी खेळतात. आमच्या घरी येणारे शेजारी, नातेवाईक आणि साधक यांच्याशी ती सहजतेने जवळीक साधते. त्यामुळे सर्वांना ती हवीहवीशी वाटते. आम्हाला साधक किंवा नातेवाईक भेटल्यावर ते कलाताईची आवर्जून विचारपूस करतात.

श्री. सोहम् सिंगबाळ

३. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याप्रती भाव असणे

आमच्या सावईवेरे येथील घरी परंपरेनुसार वर्षभर कुलाचार, सण आणि उत्सव साजरे केले जातात. आमच्या कुटुंबातील प्रत्येक परिवाराला एक वर्ष अशी चौघांना ४ वर्षे वाटून दिली आहेत. आमचे कुलाचाराचे वर्ष असेल, तेव्हा कलाताई तिथे झोकून देऊन आणि दायित्व घेऊन सेवा करते. ‘आईची (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची) धावपळ होऊ नये किंवा तिचा वेळ जाऊ नये’; म्हणून ती काळजी घेते. त्यामुळे आईला पुष्कळ साहाय्य होते. तिचा आईप्रती भाव असल्याने ती आईची सेवा ‘संतांची सेवा’ या भावाने करते. ‘आई देवीसारखी आहे’, असे तिला वाटते.

४. पू. मळयेआजींप्रती भाव असणे

कलाताईला पू. मळयेआजी (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या आई) यांच्या सहवासात आनंद मिळतो. तिचा त्यांच्याप्रतीही भाव आहे.

५. घर स्वच्छ आणि नीटनेटके आश्रमासारखे ठेवणे

कलाताईमध्ये नीटनेटकेपणा आणि स्वच्छता हे गुण आहेत. ती आमचे घर आश्रमासारखे ठेवण्याचा प्रयत्न करते. साधकांना आमच्या घरी आल्यावर आश्रमासारखेच वाटते.

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणे

कलाताईचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे. तिच्या मनाला कधी काळजी किंवा भीती वाटली, तर ती परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण करून त्यांना आत्मनिवेदन करते आणि ती परात्पर गुरु डॉक्टरांना ‘मला स्थिर रहाता येऊ दे’, अशी प्रार्थना करते. त्यामुळे तिची भीती आणि काळजी अल्प होते.

७. परात्पर गुरु डॉक्टरांनी कौतुक करणे आणि सुश्री (कु.) कलाताईंची साधना चांगली चालू असल्याचे सांगणे

परात्पर गुरु डॉक्टर आईकडे (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याकडे) आजीची (पू. नीलेश सिंगबाळ यांच्या आईची) विचारपूस करतात. त्या वेळी ते सुश्री (कु.) कलाताईचीही आठवण काढतात. ‘किती छान साहाय्यक मिळाली ना ! त्या साधकच आहेत’, असे म्हणून ते तिचे कौतुक करतात, तसेच ‘तिची चांगली साधना चालू आहे’, असेही सांगतात. परात्पर गुरु डॉक्टर सणाच्या दिवशी आजीसाठी खाऊ पाठवतात. तेव्हा ते कलाताईसाठीही आवर्जून खाऊ पाठवतात.

८. कलाताईंमधे जाणवलेले आध्यात्मिक पालट

तिच्या तोंडवळ्याकडे बघून मला पुष्कळ आनंद जाणवतो. ‘तिच्यामधे स्थिरता वाढली आहे’, असे मला वाटते आणि तिच्या तोंडवळ्यावर तेजही दिसते. ‘तिची साधना चांगली चालू असल्यामुळे तिचा तोंडवळा उजळला आहे’, असे मला वाटते.

  अशा प्रेमळ आणि गुणसंपन्न कलाताई आम्हाला दिल्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. सोहम् नीलेश सिंगबाळ (वय २४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१.२०२२)