मुंबई येथील सेवाकेंद्रात परात्पर गुरु डॉक्टरांचा प्रत्यक्ष लाभलेला सहवास आणि त्यांच्या सत्संगात मिळालेली अनमोल शिकवण !

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉक्टरांच्या अभ्यासवर्गामुळे नामस्मरणाला झालेला आरंभ !

१ अ. ‘मानसिक शांतता मिळावी’, यासाठी एका व्यक्तीकडे गेल्यावर तिच्या सांगण्यानुसार परात्पर गुरु डॉक्टर घेत असलेल्या अध्यात्मशास्त्राच्या अभ्यासवर्गाला जाणे आणि तेथे नियमित जाऊ लागल्याने मनाचा गोंधळ न्यून होणे : ‘माझ्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे माझे मानसिक संतुलन ठीक नसायचे. वर्ष १९९३ मध्ये मानसिक शांतता मिळावी, यासाठी मी श्री स्वामी समर्थांचे उपासक असलेल्या एका व्यक्तीकडे नेहमी जात असे. त्यांनी एकदा मला विचारले, ‘‘दादरला अध्यात्मशास्त्राचे अभ्यासवर्ग असतात. तेथे तुला येण्यास जमेल का ?’’ तेव्हा मी त्वरित ‘हो’ म्हटले. अभ्यासवर्गात परात्पर गुरु डॉक्टर देव-देवतांबद्दल शास्त्रीय माहिती द्यायचे. त्यामुळे मला त्या अभ्यासवर्गात वेगळेपणा जाणवला. मी प्रत्येक आठवड्याच्या अभ्यासवर्गाला नियमित जाऊ लागलो. त्यामुळे माझ्या मनातील गोंधळ न्यून होत गेला आणि मनाला शांती जाणवू लागली. तेव्हा मी ठरवले, ‘काही झाले, तरी अभ्यासवर्ग चुकवायचे नाहीत.’

१ आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी नामजप करण्याचे महत्त्व सांगितल्यावर ‘पूर्वी करत असलेली उपासना बंद कशी करायची ?’, असा विचार मनात येणे आणि कुलदेवीचा नामजप करू लागल्यावर आनंद मिळून अन्य उपासना बंद करणे : परात्पर गुरु डॉक्टर अभ्यासवर्गात कुलदेव, कुलदेवी आणि श्री गुरुदेव दत्त या देवतांचा नामजप करण्याचे महत्त्व सांगायचे. मी ३ – ४ वर्षे नियमितपणे श्री गणेश अथर्वशीर्षाचे पठण करत होतो, तसेच २१ व्या मंगळवारी घरी होम करत होतो. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘आपण करत असलेली उपासना एकदम बंद कशी करायची ?’ या संदर्भात परात्पर गुरु डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी कुलदेवीचा नामजप चालू करण्यास सांगून हळूहळू प्रयत्न करण्यास सांगितले. तसे करू लागल्यावर मला नामजपाची गोडी लागली आणि त्यातून आनंद मिळू लागला. त्यानंतर मी बाकीची उपासना बंद केली.

१ इ. अभ्यासवर्गात ‘सूक्ष्मातला अभ्यास कसा करायचा ?’, हे शिकवून साधकांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता वाढवणे : अभ्यासवर्गात परात्पर गुरु डॉक्टर ‘सूक्ष्मातील अभ्यास कसा करायचा ?’, हे शिकवत असत. ‘एखाद्या ठिकाणी धार्मिक विधी किंवा यज्ञ चालू असल्यास त्यामुळे वातावरणात काय पालट होतात ?’, तसेच देवळात जातांना ‘देवळाबाहेर आणि देवळाच्या आत मनाला काय जाणवते ?’, हे पहायला सांगायचे अन् त्यामागचे शास्त्रही सांगायचे. अशा प्रकारे ते साधकांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता वाढवायचे.

श्री. अशोक जाधव

२. अभ्यासवर्गात सांगितल्याप्रमाणे सत्सेवेला केलेला प्रारंभ !

२ अ. प.पू. भक्तराज महाराज यांची सुवचने ‘कार्डपेपर’वर लिहिण्याची सेवा करतांना वेगळाच आनंद मिळून तो आनंद परत परत मिळवण्यासाठी सेवाकेंद्रात जाऊ लागणे : अभ्यासवर्गात सेवेचे महत्त्व सांगितल्यावर मी सेवेला प्रारंभ केला. एकदा सुटीच्या दिवशी माझे सेवाकेंद्रात जाणे झाले. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी मला घरी सेवा करण्यासाठी प.पू. भक्तराज महाराज यांची सुवचने ‘कार्डपेपर’वर लिहून आणण्यास सांगितली. हा माझा सेवेचा आरंभ होता. प.पू. बाबांची सुवचने लिहितांना मला वेगळाच आनंद मिळून मन निर्विचार होऊ लागले. हा आनंद परत मिळवण्यासाठी मी कार्यालयातील कामकाज झाल्यावर सेवाकेंद्रात सेवेसाठी जाऊ लागलो. अशा प्रकारे माझे सेवेला जाण्याचे प्रमाण वाढले.

२ आ. गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाप्रसाद वाढतांना ‘खांदे दुखतात, तर पातेली उचलायला जमतील का ?’, असा विचार मनात येणे आणि त्या स्थितीत सेवा केल्यावर ‘खांदेदुखी कधी बंद झाली’, ते न कळल्याने श्रद्धा वाढणे : वर्ष १९९३ मध्ये प.पू. भक्तराज महाराज यांचा गुरुपौर्णिमा महोत्सव मुंबई, माटुंगा येथे साजरा करण्यात आला. त्या दिवशी भक्तांना महाप्रसाद वाढण्याची सेवा माझ्याकडे होती. तेव्हा माझ्या मनात विकल्प आला की, आपले दोन्ही खांदे दुखतात, तर एवढी मोठी पातेली उचलायला जमतील का ? तशाच स्थितीत मी प.पू. बाबांचे नाव घेत सेवा करू लागलो आणि ‘सेवा करतांना माझे दोन्ही खांद्यांचे दुखणे कधी बंद झाले’, हे मला कळलेही नाही. ‘सेवा मनापासून आणि गुरूंवर श्रद्धा ठेवून केली, तर परात्पर गुरु डॉक्टर आपल्याकडून ती सेवा सहजतेने करून घेतात’, हे मला शिकायला मिळाले अन् त्यामुळे माझी श्रद्धा वाढली.

३. कापडी फलक बनवण्याची सेवा परिपूर्ण होण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी शिकवलेले अनेक बारकावे

३ अ. प.पू. भक्तराज महाराज यांनी ‘सर्व साधकांना सेवेचा लाभ व्हावा’, यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांना वेगवेगळ्या ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी करण्यास सांगणे आणि त्यानुसार प्रत्येक गुरुपौर्णिमेसाठी २७ कापडी फलक बनवून द्यायचे ठरणे : प.पू. भक्तराज महाराज यांनी परात्पर गुरु डॉक्टरांना सांगितले, ‘‘सर्व साधकांना सेवेचा लाभ घेता यावा, यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी करूया.’’ त्याप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘सनातन भारतीय संस्कृती संस्था’ या नावाने एकूण २७ ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी करण्याचे ठरवले. त्यासाठी लागणारे कापडी फलक (बॅनर), तसेच व्यासपिठावर लावण्यासाठीचा गुरुकृपायोगाचे बोधचिन्ह (लोगो), सभागृहात लावण्यासाठी प.पू. बाबांची सुवचने इत्यादी मिळून एका ठिकाणच्या गुरुपौर्णिमेसाठी एकूण २७ कापडी फलक बनवून द्यायचे ठरले. हे फलक बनवण्याच्या सेवेची संधी मला मिळाली.

३ आ. कापडी फलक बनवण्याची सेवा करतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी प्रत्येक टप्प्यावर सर्व बारकावे शिकवणे आणि २७ गुरुपौर्णिमांसाठीचे कापडी फलक २ – ३ मासांत बनवले जाणे : मला ‘कापडी फलक कसे बनवायचे ?, ते कसे रंगवायचे ?’, याविषयी काहीच ठाऊक नव्हते. तेव्हा ‘ही सेवा आपल्याला जमेल का ?’, असा विचार मनात आला. सेवेला प्रारंभ केल्यावर असे लक्षात आले की, परात्पर गुरु डॉक्टर प्रत्येक टप्प्यावर मला शिकवत होते. १० फूट, १५ फूट किंवा २० फूट लांबीचे कापडी फलक बनवतांना ‘त्यावरील लिखाण, अक्षरांचा आकार, दोन अक्षरांमधील अंतर किती असायला हवे ? रंगवण्यासाठी किती रंग लागतो ? आणि किती कालावधीमध्ये कापडी फलक पूर्ण झाला पाहिजे ?’, हे सर्व त्यांनी मला शिकवले अन् माझ्याकडून करवून घेतले. मला काहीही येत नसतांना २७ गुरुपौर्णिमांसाठी २७ कापडी फलकांचा (बॅनरचा) संच त्यांनी २ – ३ मासांच्या कालावधीत पूर्ण करून घेतला. त्या वेळी ‘गुरूंवर श्रद्धा ठेवून सेवा केली, तर ‘गुरूच आपल्याकडून ती सेवा करून घेतात’, याची अनुभूती मला आली.

३ इ. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘ठिकठिकाणच्या गुरुपौर्णिमेसाठी कापडी फलकांचे संच पाठवतांना काटकसर, वेळेची बचत आणि नियोजन कसे करायचे ?’, याविषयी दिलेला दृष्टीकोन ! : गुरुपौर्णिमेला सभागृहात लावायचे कापडी फलक सिद्ध होत असतांना एकदा मुंबईत रहाणारे एक साधक सेवाकेंद्रात आले होते. त्या वेळी मी ‘त्या साधकासमवेत गुरुपौर्णिमेचे कापडी फलक पाठवून देऊ का ?’, असे परात्पर गुरु डॉक्टरांना विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘बाहेरगावचे कुणी साधक मुंबईत आले, तर सिद्ध झालेले हे कापडी फलक प्रथम त्यांच्या समवेत पाठवून देऊ, म्हणजे आपल्याला ते बसने पाठवावे लागणार नाहीत. नाहीतर ‘पार्सल’ पाठवणे आणि आणणे, यांसाठी पैसे, तसेच दोन्हीकडील साधकांचा वेळ जातो. मुंबईत साजर्‍या होणार्‍या गुरुपौर्णिमेचे कापडी फलक शेवटी दिले, तरी चालतील. त्यांना आपण नंतर बोलावून ते देऊ शकतो.’’ यावरून ‘इतरांचा विचार आणि काटकसर कशी करायची ?’, तसेच ‘नियोजन कसे करायचे ?’, हे मला शिकायला मिळाले.

३ ई. ‘सेवेची फलनिष्पत्ती कशी वाढवायची ?’, तसेच ‘अन्य साधकांना कसे सिद्ध करायचे ?’, याची परात्पर गुरु डॉक्टरांनी दिलेली शिकवण ! : परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘संस्थेचे कापडी फलक कसे रंगवायचे ?’, हे मला शिकवले. नंतर ‘ती सेवा अन्य साधकांना कशी शिकवायची आणि त्यांच्याकडून कशी करून घ्यायची ?’, हेही शिकवले. नवीन साधकांना लगेच कापडी फलक रंगवता येत नाहीत. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी मला सांगितले, ‘‘१० फूट, १५ फूट आणि २० फुट लांबीच्या कापडी फलकांवरील बोधचिन्ह (लोगो) रंगवतांना तुम्ही केवळ अक्षरांची कडा (बॉर्डर) रंगवून ठेवा. अक्षरांच्या मधे रंग भरू नका. कुणी नवीन साधक सेवेसाठी आला, तर त्याला अक्षरांच्या आत रंग भरण्यास सांगा. त्यामुळे सेवा लवकर होईल आणि नवीन साधकाला सेवा करण्याचा आनंद मिळून तोही सेवेसाठी सिद्ध होईल. अशा प्रकारे ‘सेवेची फलनिष्पत्ती कशी वाढवायची ? अन्य साधकांना कसे सिद्ध करायचे ?’, हे सर्व परात्पर गुरु डॉक्टरांनी मला शिकवले. कापडी फलक सिद्ध झाल्यावर ‘त्याला इस्त्री करून त्याची घडी कशा प्रकारे घालायची की, ज्यामुळे चांगली स्पंदने येतील’, हेसुद्धा आम्हाला परात्पर गुरु डॉक्टरांनी शिकवले.

३ उ. ‘केवळ स्वतःच्या सेवेचा विचार न करता इतरांचा विचारही करायला हवा’, याची करून दिलेली जाणीव ! : एकदा कापडी फलक रंगवण्याची सेवा करत असतांना जेवणाची वेळ झाली. तेव्हा ‘दोन-तीन अक्षरेच रंगवायची राहिली आहेत. तेवढी रंगवून झाली की, आपण जेवायला जाऊ’, असा विचार करून मी ती रंगवत बसलो. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर तेथे आले आणि म्हणाले, ‘‘तुम्ही केवळ तुमच्या सेवेचा विचार केलात. स्वयंपाक करणार्‍या साधकांचा विचार केला नाही. ‘सर्वांचे जेवण झाल्यावर सर्व आवरून ठेवण्यात त्यांचा पुष्कळ वेळ जातो’, याचाही विचार करायला हवा.’’ त्यानंतर मी माझी सेवा तेथेच थांबवून जेवण करण्यासाठी गेलो. या प्रसंगावरून परात्पर गुरु डॉक्टरांनी दुसर्‍यांचा विचार करण्यास शिकवले.

– श्री. अशोक चंद्रकांत जाधव, नालासोपारा, मुंबई.

(२४.१२.२०२०) (क्रमशः उद्याच्या अंकात)