भीषण काळाला तोंड देण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर पूर्वसिद्धता करणे आवश्यक ! – सौ. शुभा सावंत, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अस्नोडा येथे ‘हिंदु संस्कृती आणि महाशिवरात्र’ या विषयावर प्रवचन

प्रवचनाला उपस्थित जिज्ञासू

डिचोली, ३ मार्च (वार्ता.) – नाडीभविष्य सांगणार्‍या अनेकांनी, तसेच द्रष्ट्या साधू-संतांनी ‘तिसर्‍या महायुद्धाला आरंभ होणार आहे’, असे सांगितले आहे. या भीषण काळाला सामोरे जाण्यासाठी प्रत्येकाने शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर पूर्वसिद्धता करणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. शुभा सावंत यांनी केले. समितीच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने श्री महेश्वर देवस्थान, कैलासनगर, अस्नोडा येथे ‘हिंदु संस्कृती आणि महाशिवरात्र’ या विषयावर व्याख्यानात घेण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. या प्रवचनाला ८० शिवभक्त उपस्थित होते.

सौ. सावंत पुढे म्हणाल्या,

सौ. शुभा सावंत

१. ‘‘भीषण आपत्काळामध्ये इंधनाचा तुटवडा; खाण्या-पिण्याच्या वस्तूंचा तुटवडा; डॉक्टर, वैद्य, औषधे, रुग्णालये आदींची अनुपलब्धता असणे आदींचा प्रत्येकाला सामना करावा लागणार आहे. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पूर्वसिद्धता म्हणून घरच्याघरी पारंपरिक औषधे मिळण्यासाठी वनस्पती, झाडे, घरी लागणारा भाजीपाला किंवा स्वत:च्या भूमीत धान्य आदींची लागवड आदी करावे लागेल.

२. आपल्या कुटुंबाचे कठीण काळात रक्षण कसे करता येईल, याविषयी हिंदु जनजागृती समिती प्रथमोपचार प्रशिक्षण, स्वरक्षण प्रशिक्षण, धर्मशिक्षण वर्ग आदी विनामूल्य वर्ग ‘ऑनलाईन’ स्वरूपात घेत आहे.

३. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर लक्ष टाकल्यास आपणास लक्षात येईल की, महाराजांनी लहान वयातच शत्रूच्या सैनिकांच्या तुलनेत अवघ्या मावळ्यांच्या साहाय्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जिजाऊमातेने छत्रपती शिवाजी महाराजांवर कोणते संस्कार केले ? हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि आपण आपल्या पाल्यांना कोणते संस्कार देतो याचे आत्मपरीक्षण प्रत्येक पालकाने केले पाहिजे.

४. हिंदूंनी धर्माबद्दल अभिमान राहिलेला नसल्याने आजकाल कुणीही उठतो आणि हिंदु धर्मावर टीकाटीपणी करण्यास धजावतो; मात्र इतर धर्मियांमध्ये एखादे धर्माच्या विरोधात कृत्य घडल्यास त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत उमटत असतांना आपण पहातो.’’

सौ. शुभा सावंत यांनी प्रवचनाच्या प्रारंभी महाशिवरात्रीच्या निमत्ताने शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणा का घालावी ?, शिवाला बेल वहाण्याच्या पद्धतींमागील अध्यात्मशास्त्र आदींविषयी माहिती दिली. कार्यक्रमाच्या आरंभी सौ. सोनम शिरोडकर यांनी स्वागत केले, तर सूत्रसंचालन श्री. शैलेश शिरोडकर यांनी केले.