युक्रेनने भारतियांना ओलीस ठेवल्याचा रशियाचा आरोप भारताने फेटाळला !
नवी देहली – खारकीवमध्ये युक्रेनने भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवले आहे. युक्रेनकडून त्यांचा ‘मानवी ढाल’ म्हणून वापर केला जात आहे, असा आरोप रशियाने केला होता. त्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘युक्रेनमधील भारतीय दूतावास तेथे अडकलेल्या सर्व भारतियांच्या संपर्कात आहे. युक्रेन प्रशासनाने केलेल्या सहकार्यामुळे खारकीवमधून अनेक भारतीय विद्यार्थी बाहेर पडले आहेत. अद्याप तरी कुठल्याही भारतीय विद्यार्थ्याला ओलीस ठेवल्याची माहिती नाही.’
India rejects claims by Russia, Ukraine that citizens in Kharkiv are ‘hostages’ @Rezhasan https://t.co/hxwj6FPpUV
— Hindustan Times (@HindustanTimes) March 3, 2022
परराष्ट्र मंत्रालयाने पुढे म्हटले की, रशिया, रोमानिया, पोलंड, हंगेरी, स्लोव्हाकिया आणि मोल्डोव्हा या देशांशी भारत प्रभावीपणे समन्वय साधून आहे. गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात भारतियांना युक्रेनमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. युक्रेन प्रशासनाने मोठे सहकार्य केले आहे. युक्रेनच्या पश्चिमेला असलेल्या शेजारी देशांचे आम्ही आभारी आहोत. त्यांनी भारतियांना मायदेशी आणण्यासाठी उड्डाणांची व्यवस्था केली. यासह युक्रेन प्रशासनाने भारतीय विद्यार्थ्यांना खारकीवसह जवळच्या इतर भागांमधून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अधिकाधिक विशेष रेल्वेची व्यवस्था करावी.
अमेरिकेने रशियाचा आरोप फेटाळला !
रशियाने भारतीय विद्यार्थ्यांविषयी युक्रेनवर केलेला आरोप अमेरिकेनेही फेटाळून लावला. अमेरिकेने म्हटले आहे की, भारतीय नागरिकांचा ‘मानवी ढाल’ म्हणून उपयोग केल्याची कुठलीही घटना युक्रेनमधून समोर आलेली नाही. हा रशियाचा कांगावा आहेे. रशियाकडून चुकीची माहिती पसरवली जात आहे.
रशियाशी चर्चा करू ! – युक्रेन
‘तुमच्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी एक मार्ग सिद्ध करण्यासाठी रशियाशी चर्चा करू’, असे युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्वीट करत भारत आणि अन्य देशांना सांगितले आहे.