भारतरत्न लता मंगेशकर यांच्या शोकप्रस्तावाच्या वेळीही विधान परिषदेत गोंधळाची स्थिती !
विधान परिषद
मुंबई, ३ मार्च (वार्ता.) – गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या शोकप्रस्तावाच्या वेळीही विधान परिषदेत गोंधळाची स्थितीचा दुर्दैवी प्रकार पहायला मिळाला. या वेळी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना शोकप्रस्तावाच्या वेळी सभागृहात शांतता पाळण्याचे आवाहन करावे लागले. शोकप्रस्तावात लता मंगेशकर, प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज आदी मान्यवर व्यक्तींचा समावेश असूनही सत्ताधारी किंवा विरोधक यांपैकी कुणीही शोकप्रस्तावावर मनोगत व्यक्त केले नाही.
‘जागतिक गायिका लता मंगेशकर यांचा शोकप्रस्ताव मांडत आहे; त्यामुळे सर्वांनी शांतता पाळा’, असे आवाहन या वेळी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. त्यानंतर काही प्रमाणात सभागृहातील गोंधळ न्यून झाला. विधान परिषदेचे सदस्य रामनिवास सिंह, नारायण पाटील, सुधीर जोशी, माजी मंत्री दत्तात्रय लंके, श्रीमती संजीवनी रायकर, श्रीमती आशाताई टाले, श्रीमती कुमुद रांगणेकर यांच्या दु:खद निधनाचाही शोकप्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला.
नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी सभात्याग केलेल्या विरोधकांनी शोकप्रस्तावाच्या वेळी पुन्हा सभागृहात प्रवेश केला; मात्र शोकप्रस्तावाच्या वेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह विरोधी पक्षांतील केवळ ३-४ सदस्यच सभागृहात उपस्थित होते, तसेच सत्ताधारी पक्षातील सदस्यांची संख्याही अल्प होती.