हिंडलगा (बेळगाव) कारागृहातील स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा हटवल्याने संताप : हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जाब विचारून पुन्हा नवी प्रतिमा लावली !
स्वातंत्र्यवीर सावरकर हे प्रखर हिंदुत्वनिष्ठ असल्यानेच हिंदुद्वेषापोटी कारागृह प्रशासन त्यांची प्रतिमा हटवण्याची कृती करते ! – संपादक
बेळगाव, २ मार्च – हिंडलगा येथील कारागृहातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची प्रतिमा कारागृह प्रशासनाने अचानक कोणतेही कारण न देता काढून टाकली. ही गोष्ट हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींना समजल्यावर त्यांनी कारागृह प्रशासनाला जाब विचारला आणि ठाम भूमिका घेत त्याच ठिकाणी दुसरी प्रतिमा लावण्यास भाग पाडले.
१. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ४ एप्रिल ते १३ जुलै १९५० मध्ये हिंडलगा येथील कारागृहात होते. या घटनेची आठवण म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा कारागृहात लावण्यात आली होती. सावरकरांची जयंती आणि पुण्यतिथी अशा प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते तेथे जाऊन वंदन करत होते. मागील २ वर्षांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे कुणालाही कारागृहात जाऊन वंदन करता आले नाही. या काळात सावरकरांची प्रतिमा हटवण्यात आली.
२. ही गोष्ट हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाप्रमुख रवि कोकितकर यांना ते वंदन करण्यासाठी कारागृहात गेल्यावर लक्षात आली. त्यांनी तात्काळ अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या प्रतिनिधींना बोलावल्यावर जाब विचारला.
३. यानंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी जोवर प्रतिमा लावत नाही, तोपर्यंत आंदोलन करण्याची चेतावणी दिली. त्यामुळे कारागृह प्रशासनाने प्रतिमा पुन्हा लावण्याला अनुमती दिली. हिंदू राष्ट्र सेना आणि काही हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा आणली, तसेच त्या प्रतिमेचे विधिवत् पूजन करण्यात आले. या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ मारुति सुतार, नागेश पाटील, विनय आग्रोळी, तसेच इतर उपस्थित होते.