पुणे येथे समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यासह २० जणांवर गुन्हा नोंद !
दर्ग्याचे बांधकाम चालू असल्याचा एकबोटेंचा दावा
पुणे – श्री पुण्येश्वर मंदिर येथील दर्ग्याच्या बांधकामाला न्यायालयाची स्थगिती असतांना आणि तेथे काम चालू नसतांना काम चालू आहे, असे सांगितले. तसेच महाआरती करून दिशाभूल करणारी पत्रके वाटून २ समाजात तेढ, द्वेष निर्माण व्हावा, यासाठी प्रयत्न केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यासह २० जणांवर गुन्हा नोंद केला आहे.
याविषयी बोलतांना मिलिंद एकबोटे म्हणाले की, संबंधितांनी श्री पुण्येश्वर मंदिरासंबंधी पुरावे नष्ट केले आहेत. ५ मजली इमारतीचे काम चालू केले आहे. न्यायालयाने स्थगिती दिली असूनही काम चालू आहे. तेथे बांधकाम चालू नसल्याचा दावा करून पोलीस संबंधितांना पाठीशी घालत आहेत. पोलिसांनी आमचे २ प्रतिनिधी आणि त्यांचे २ प्रतिनिधी घेऊन पहाणी करावी.