विधीमंडळात विरोधकांच्या सर्व प्रश्नांना चर्चेतून उत्तरे दिली जातील ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

अजित पवार

मुंबई, २ मार्च (वार्ता.) – अधिवेशन २५ मार्चपर्यंत चालवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. ११ मार्च या दिवशी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. विरोधकांच्या सर्व प्रश्नांचा चर्चेतून उत्तरे दिली जातील, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेत केले. या वेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, परिवहनमंत्री अनिल परब आणी अन्य मंत्री उपस्थित होते.

या वेळी अजित पवार म्हणाले 

१.  विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याविषयी राज्यपालांना पत्र देण्यात आले आहे. त्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचा आहे. राज्यपाल सकारात्मक निर्णय घेतील, अशी आशा आहे.

२. सद्यस्थितीत तरी मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिक यांचे त्यागपत्र घ्यायचे नाही, असा निर्णय घेतला आहे; मात्र विधीमंडळातील कामकाजानुसार भूमिका पालटू शकते. जे कायद्यानुसार योग्य असेल, ते होईल.

३. अधिवेशनाला मुख्यमंत्री उपस्थित रहातील.

४. एस्.टी. कामगारांच्या संपाविषयीचा अहवाल ३ मार्च या दिवशी पटलावर ठेवण्यात येणार आहे.

५. सभागृहात जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जातील. त्यासाठी शासनाची भूमिका दोन पावले मागे-पुढे होईल. सध्या राज्यात जे आरोप-प्रत्यारोप आहेत, ते राज्याला शोभणारे नाहीत. सत्ताधारी-विरोधक यांनी पथ्ये पाळायला हवीत. महाराष्ट्राची संस्कृती जपायला हवी. महत्त्वाचे विषय बाजूला रहातात आणि अनावश्यक विषयांवर चर्चा होत रहाते.