सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिदिन ७७ लक्ष लिटर सांडपाणी प्रक्रिया न करता समुद्रात सोडले जाते !
|
प्रक्रिया न करता सांडपाणी सोडले जात आहे, हे प्रशासनाला का दिसत नाही ?
सिंधुदुर्ग, २ मार्च (वार्ता.) – जिल्ह्यातील ३ नगरपरिषदा आणि १ नगरपंचायत यांच्याकडून प्रतिदिन एकूण ७७ लक्ष लिटर प्रदूषित सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता समुद्र अन् नदी यांमध्ये सोडले जात आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. संजय जोशी यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे माहितीच्या अधिकाराखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषदांकडून सोडण्यात येणार्या सांडपाणी प्रक्रियेविषयी माहिती मागवली असता हा प्रकार उघड झाला आहे.
प्रदूषित सांडपाणी प्रक्रिया न करता तसेच समुद्र आणि नदी यांमध्ये सोडले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याला, पर्यायाने जिवाला धोका निर्माण झाल्याने संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्री. संदेश गावडे यांनी पत्रकार परिषदेत केली. २८ फेब्रुवारी या दिवशी जिल्हा मुख्यालयातील पत्रकार कक्षात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांची वंदनीय उपस्थिती होती.
पत्रकार परिषदेत श्री. गावडे म्हणाले की,
१. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार मालवण, वेंगुर्ला आणि सावंतवाडी या नगरपरिषदांकडून प्रतिदिन अनुक्रमे १५, २५ आणि २५ लक्ष लिटर सांडपाणी, तर कणकवली नगरपंचायतीकडून प्रतिदिन १२ लक्ष लिटर सांडपाणी त्यावर कोणतीही प्रक्रिया न करता समुद्रात किंवा नदीत सोडले जाते.
२. याविषयी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित नगरपरिषद आणि नगरपंचायत यांना १४ ऑक्टोबर २०२० या दिनांकाने नोटीस पाठवल्या होत्या. ‘सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि ‘ऑनलाईन’ सांडपाणी निरीक्षण प्रणाली बसवण्यात याव्यात’, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे; परंतु यावर पुढे काहीही कृती झालेली नाही.
३. खरे तर प्रदूषण नियंत्रण मंडळ संबंधित नगरपरिषद आणि नगरपंचायत यांच्या अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी केवळ नोटीस पाठवून स्वतःचे दायित्व झटकत आहे का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याविषयी प्रदूषण मंडळाकडून होत असलेला विलंबही प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.
४. प्रदूषित सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट समुद्रात सोडल्याने समुद्रातील जीवसृष्टीवर त्याचा परिणाम होतो. प्रदूषित पाण्याने मासे मृत झाल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत.
५. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश जनता ही मत्स्याहारी असल्याने प्रदूषित पाणी प्रक्रिया न करता थेट समुद्र किंवा नदी यांत सोडल्याने नागरिकांच्या आरोग्याला, पर्यायाने जिवाला धोका निर्माण झाला आहे. हे मासे बाहेरील शहरांतही पाठवले जात असल्याने या धोक्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे.
६. कोरोना, ओमिक्रॉन यांसारख्या संसर्गजन्य महामारीने संपूर्ण जग ग्रासलेले असतांना अशा प्रकारचा निष्काळजीपणा नागरिकांच्या जिवाचा धोका वाढवत आहे. या प्रकरणी आम्ही हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्यांचा समादेश (सल्ला) घेतला. त्यामुळे नगरपरिषदा आणि नगरपंचायत यांच्यावरच नव्हे, तर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संबंधित अधिकारी अन् कर्मचारी यांच्यावरही विभागीय चौकशीसह फौजदारी कारवाई होऊ शकते.
कोकणातील पर्यावरणावर भविष्यात गंभीर दुष्परिणाम ! – अधिवक्त्या (सौ.) अस्मिता सोवनी, हिंदु विधीज्ञ परिषद
प्रदूषण करणे हा गुन्हा असून त्यावर कारवाई न करणे, हे गुन्ह्याला पाठीशी घालण्यासारखे आहे. तसेच या प्रकरणी संबंधितांना कायदेशीर नोटीसही दिली आहे. प्रदूषण ही विषारी समस्या असून शहरीकरणाकडे चाललेल्या कोकणात आताच या समस्येवर कारवाई केली नाही, तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे प्रदूषण थांबवण्यासाठी संबंधितांवर त्वरित कारवाई करावी, अन्यथा पुढच्या कारवाईचे दरवाजे उघडे आहेत, असे आवाहन अधिवक्ता (सौ.) अस्मिता सोवनी यांनी केले.