शेवटची १५ मिनिटे !
मनुष्याचा शेवटचा दिवस गोड होण्यासाठी त्याने आयुष्यभर साधना करणे आवश्यक !
जेव्हा जेव्हा अध्यात्म आणि विज्ञान यांची तुलना केली जाते, तेव्हा तेव्हा ‘विज्ञान किती बाळबोध आहे ?’, हे पुनःपुन्हा सिद्ध होते. आताही पुन्हा एकदा हे सिद्ध होण्याचे निमित्त ठरले ते कॅनडामधील वैशिष्ट्यपूर्ण संशोधन ! या संशोधनात शास्त्रज्ञांनी ‘व्यक्तीच्या मृत्यूसमयी तिला जीवनातील बहुतेक सर्व घटना वेगाने आठवतात’, असे सिद्ध केले आहे. कॅनडाच्या ब्रिटीश कोलंबिया प्रांतातील ‘वँकुव्हर जनरल हॉस्पिटल’चे शास्त्रज्ञ डॉ. झेम्मर आणि त्यांच्या तज्ञ चमूने हृदयविकाराचा झटका आलेल्या एका ८७ वर्षीय व्यक्तीच्या मेंदूमधील क्रियेची ‘इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफी’ चाचणी केली.
ही चाचणी म्हणजे मेंदूची विद्युत् क्रिया नोंद करण्याची एक पद्धत आहे. या वेळी मरणासन्न स्थितीत असलेल्या त्या व्यक्तीचे हृदय बंद पडण्यापूर्वी ९०० सेकंदांमध्ये (१५ मिनिटे) तिच्या मेंदूमध्ये काय प्रक्रिया घडते ? तसेच अखेरच्या ३० सेकंदांमध्ये मेंदूमधील क्रिया नोंदवण्यात आली. या वेळी त्यांना शेवटच्या क्षणी व्यक्तीच्या मेंदूत तिच्या ‘जीवनातील बहुतेक सर्व घटनांच्या स्मृती तिच्या डोळ्यांसमोर वेगाने येत असल्याचे आढळून आले. या संशोधनामुळे ‘मरतेवेळी जीवन आठवते’, या सिद्धांताला पुष्टी मिळाली आहे. विज्ञानाच्या इतिहासात अशा प्रकारचे संशोधन प्रथमच झाले आहे. विज्ञानाने हे संशोधन केले खरे; पण ‘त्यापुढे काय ?’, याचे उत्तर ते देऊ शकलेले नाही. एका अर्थी ‘विज्ञान नवनवीन संशोधन करते, ते स्वतःतील उणिवा अधोरेखित करण्यासाठी’, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये; कारण या संशोधनांतून मर्यादित गोष्टीच जगाला ठाऊक होतात; पण त्यामागील कार्यकारणभावाविषयी विज्ञान भाष्य करू शकत नाही, तर त्याविषयी केवळ अध्यात्मच सांगू शकते. ‘मरतांना माणूस सत्य बोलतो’, असे आपण ऐकत आलो आहोत. मनातील हे सत्यच मरतांना विचारांच्या रूपात प्रकट होत असते. आपण आयुष्यात किती पाप-पुण्य केले, हे केवळ आपल्यालाच ठाऊक असते. त्यावरच मृत्यूसमयीचे विचार अवलंबून असतात. यावरून ‘आयुष्यभर चांगली कर्मे करणे का आवश्यक आहे ?’, याचे महत्त्व अधोरेखित होते. मरण्यापूर्वीच्या या विचारांना ‘पश्चात्ताप बुद्धी’ म्हणायचे का ? समजा ती असली, तरी त्या वेळी उपरती होऊन काय उपयोग ? माणसाच्या मृत्यूसमयी त्याच्या मनात जे विचार असतात किंवा ज्या इच्छा-आकांक्षा असतात, त्यानुसार त्याला पुढची गती मिळते. असे असले, तरी कर्मसिद्धांतानुसार ज्याचे जसे कर्म असते, तसे त्याला फळ मिळते. त्यातून कुणीही सुटत नाही; कारण तो भगवंताचा नियम आहे. या जन्मी नाही, तर पुढच्या जन्मी कर्माचे फळ हे भोगावेच लागते. त्यामुळे मरण्याच्या पूर्वी होणारी पश्चात्तापाची भावना उपयोगाची नसते. त्यासाठी आयुष्यभर सद्वर्तनी रहावे लागते, तसेच साधना करून तपोबल प्राप्त करावे लागते. या तपोबलाची फलश्रुती शाश्वत आनंदात आहे. हे ज्याला उमगते, त्याचे जीवन सार्थकी लागते. ‘आयुष्य जगणे ही कला आहे’, असे म्हणूनच म्हटले आहे. सुदैव म्हणजे या कलेचा उगम आपल्या भारतात आहे; पण दुर्दैव म्हणजे आज ही कला आपण भारतीयच विसरत चाललो असून अशाश्वत अन् विनाशकारी अशी पाश्चात्त्य जीवनकला अंगीकारत आहोत. आज जीवन जगण्याची शाश्वत कला, म्हणजे ‘आनंदप्राप्ती’ कुठेही शिकवली जात नाही. शाळा-महाविद्यालयांत सभोवतालचे सर्व विषय शिकवले जातात; परंतु ‘आनंद कसा मिळवायचा ?’, हे कुठेही शिकवले जात नाही. ती का शिकवली जात नाही ? तर आज मनुष्याच्या ‘आनंद’ आणि ‘सुख’ यांच्या व्याख्याच पालटल्या आहेत. आज भौतिक सुखालाच ‘आनंद’ समजले जाते आणि आपण त्यातच रममाण होतो; म्हणूनच कलियुगातील बहुतांश जीव हे ‘वाट चुकलेले प्रवासी’ असतात, जे कधीही इच्छितस्थळी (मोक्षप्राप्तीपर्यंत) पोचू शकत नाही आणि हीच वाट चुकल्याची जाणीव एकाअर्थी आयुष्याच्या शेवटच्या १५ मिनिटांत होत असते ! मनुष्य जीवनाचा अंतिम उद्देशच ईश्वरप्राप्ती (आनंदप्राप्ती) करणे, हा आहे. म्हणजे प्रत्येक जीवनात मनुष्य ईश्वरप्राप्ती न करण्याची चूक करतच असतो. असे जन्मोजन्मी होत असते, ज्याला ‘जन्म-मृत्यूचा फेरा’ असे म्हटले आहे. मानवी जीवनाच्या या गंभीर समस्येचे उत्तरही पुन्हा हिंदु धर्मानेच दिले आहे. धर्माने सुखाची ‘सुखस्य मूलं धर्मः’ अशी व्याख्या केली आहे. याचा अर्थ ‘सुखाचे मूळ हे धर्मात, म्हणजे धर्माचरण करण्यात आहे.’ धर्माचरणाने मनुष्य जसा आनंदी बनतो, तसे त्याच्या अंगी स्थिरता आणि समाधानही येते. त्यामुळे मृत्यूसमयी जर आनंदी, स्थिर आणि समाधानी रहायचे असेल, तर त्याची सवय मनाला आयुष्यभर लावायला हवी. ही सवय म्हणजेच साधना ! आपणा भारतियांचे भाग्य म्हणजे अशा साधनेविषयी मार्गदर्शन करणारे संत आपल्याकडे जागोजागी आहेत. तथापि संतांच्या या शिकवणुकीकडे दुर्लक्ष करून मनुष्य आयुष्यभर केवळ अर्थ आणि काम यांच्या मागे लागतो, ज्याचीही उकल त्याला आयुष्याच्या शेवटच्या १५ मिनिटांत होते.
आत्मचिंतन आवश्यक !
डॉ. झेम्मर यांच्या संशोधनातून मनुष्याच्या जीवनातील शेवटच्या १५ मिनिटांचे महत्त्व आता जगभर अधोरेखित होईल. विचार १५ मिनिटांचे आहेत; पण कर्मे आयुष्यभराची दडली आहेत. विज्ञानाने आता कुठे हा शोध लावला आहे; पण आपल्या ऋषिमुनींनी सहस्रो वर्षांपूर्वी हा केवळ शोधच लावला नाही, तर त्यावर शाश्वत उपायही तेव्हाच सांगून ठेवला आहे. मरण सुसह्य होण्यासाठी आयुष्यभर काय केले पाहिजे ? याचे दिशादर्शन त्यांनी करून ठेवले आहे, जे कालही प्रमाण होते, आजही आहे आणि उद्याही राहील. अध्यात्म प्रगत, तर विज्ञान बाळबोध ठरते, ते यासाठीच ! आयुष्याच्या ज्या टप्प्यांवर सुधारण्याची संधी असते, तेव्हा मनुष्याला ‘मीच बरोबर आहे, समोरचाच चुकला आहे’, असे वाटत असते; परंतु आयुष्याच्या शेवटी विचाररूपी सत्य उलगडतांना ‘मीच चुकलो’, याची जाणीव होते. त्यामुळे चुकांच्या जाणिवेसाठी आयुष्याच्या शेवटच्या १५ मिनिटांची वाट पहाण्यापेक्षा जीवन जगतांनाच प्रतिदिन १५ मिनिटे देऊन आत्मचिंतन करून स्वतःत सुधारणा केली पाहिजे, तर आयुष्यात पश्चात्तापाची वेळ येणार नाही. त्यामुळे संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे शेवटचा दिवस खर्या अर्थाने गोड होईल !