अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने पलूसमध्ये १ सहस्र फुटी ‘तिरंगा पदयात्रा’ !
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पदयात्रा !
पलूस (जिल्हा सांगली), २ मार्च (वार्ता.) – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पलूस तालुक्याच्या वतीने शहरात १ सहस्र फुटी भव्य ‘तिरंगा पदयात्रा’ काढण्यात आली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे महत्त्व विद्यार्थी आणि जनसामान्य यांना कळावे म्हणून अभाविपच्या वतीने देशभरात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही ‘तिरंगा पदयात्रा’ काढण्यात आली. विद्यार्थी परिषद गेल्या ७५ वर्षांपासून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवण्याचे काम करत आहे.
या पदयात्रेचा प्रारंभ लक्ष्मणराव किर्लोस्कर महाविद्यालय येथून झाला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मुख्य बाजारपेठ, जिल्हा परिषद शाळामार्गे गावामधून पुन्हा किर्लोस्कर महाविद्यालयात आली आणि या पदयात्रेचा समारोप महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये करण्यात आला. या वेळी अभाविपचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री श्री. अनिल ठोंबरे, पलूस शिक्षण संस्थेचे सचिव धोंडिराम शिंदे, अभाविप जिल्हा संयोजक ऋषिकेश पोतदार, अभाविप महाविद्यालय अध्यक्ष तेजस पाटील आदी उपस्थित होते.