पैसे काढण्यासाठी रशियन नागरिकांच्या एटीएम्च्या बाहेर रांगा !

रशियावरील आर्थिक निर्बंधांचा परिणाम !

  • आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठीही गर्दी

  • सर्व वस्तूंच्या दर प्रचंड वाढ

मॉस्को (रशिया) – रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला ७ दिवस होत आलेले असतांना अद्याप रशियाला विजय मिळवता आलेला नाही. दुसरीकडे जगभरातून रशियावर आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत. रशियन बँकांमधील खाती गोठवण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. डॉलरच्या तुलनेत रशियन मुद्रेचे मूल्य मोठ्या प्रमाणात घसरले आहे. रशियातील श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत सर्वांना पैशांची चणचण भासू लागली आहे. खाद्य तेलाच्या किमती वाढल्या आहेत. या सर्वांमुळे रशियाची सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे रशियन नागरिक पैसे काढण्यासाठी एटीएम्च्या बाहेर रांगा लावत असल्याचे चित्र रशियामध्ये दिसत आहे.

१. अमेरिकेसह ‘नाटो’ देशांनी रशियाच्या केंद्रीय बँकांची संपत्ती गोठवली आहे. जागतिक बँकेतूून रशियाला वगळण्याची चर्चा चालू आहे. त्यामुळे रशियावर आर्थिक संकट उभे राहिले आहे. रशियातील थेट गुंतवणूक रोखणार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. आतापर्यंत रशियाला ६३० अरब डॉलरची हानी झाली आहे. निर्बंधांमुळे रशियात मोठी मंदी येऊ शकते. त्यामुळे घाबरलेले रशियन नागरिक पैसे काढत आहेत.

२. रशियात युद्धापूर्वी ७५ रुबलचे (रशियन चलन) मूल्य १ डॉलर इतके होते; परंतु त्यात युद्धामुळे घट झाली आहे. १ डॉलरसाठी आता लोकांना ११३ रुपये मोजावे लागत आहेत. यामुळे खाद्यपदार्थापासून इंधनापर्यंत, प्रत्येक वस्तूचे दर प्रचंड वाढले आहेत. रशियात आगामी काळात बेरोजगारी वाढणार असून लवकरच बाजारांमधील साहित्य संपणार आहे. त्यामुळे रशियन लोक अत्यावश्यक साहित्य खरेदी करण्यासाठीही धावपळ करत आहेत.

३. रशियाने या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी उपाय योजतांना देशातील नागरिकांना विदेशी पैसे पाठवण्यावर निर्बंध आणले आहेत. निर्यातदारांना त्यांच्या कमाईतील ८० टक्के रुबलमध्ये रूपांतरित करण्याचा आदेश देण्यात आला आहे. मुदत ठेवींवरील व्याजदर साडेनऊ टक्क्यांवरून २० टक्के करण्यात आला आहे.