युक्रेनच्या खरसॉन शहरावर रशियाचे नियंत्रण !

खारकीव (युक्रेन) – रशियाच्या सैन्याने आक्रमणानंतर दक्षिण युक्रेनमधील खरसॉन या शहरावर नियंत्रण मिळवले आहे; मात्र स्थानिक अधिकार्‍यांकडून याविषयी अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

खारकीवमधील रुग्णालयावर रशियाचे आक्रमण

रशियाच्या वायूदलातील सैन्याने खारकीव शहरातील स्थानिक रुग्णालयावर आक्रमण केले आहे. तेथे लढाई चालू आहे, अशी माहिती युक्रेनच्या सैन्याने दिली आहे.

व्होल्वो, मर्सिडिजनंतर हार्ले-डेविडसनकडून रशियातील उत्पादन आणि पुरवठा बंद

रशियाची आर्थिक कोंडी करण्यासाठी फोक्सवॅगन, व्होल्वो, मर्सिडिज्-बेन्झ, जनरल मोटर्स, डायम्लर ट्रक यांच्यानंतर आता हार्ले-डेविडसन या आस्थापनाने  रशियातील उत्पादन आणि पुरवठा बंद केला आहे. युक्रेनवर आक्रमण केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वप्रथम व्होल्वो आस्थापनाने रशियातील सर्व व्यवहार बंद केले होते. व्होल्वो आस्थापन स्विडन, चीन आणि अमेरिका येथून रशियात चारचाकी वाहनांची निर्यात करत होते. गेल्या वर्षी व्होल्वोने रशियात जवळपास ९ सहस्र गाड्या विकल्या होत्या.