भारतात खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील जातीयवाद आणि लाचखोरी, यांमुळे हुशार विद्यार्थी शिक्षणासाठी विदेशात जातात !
युक्रेन येथे आक्रमणात ठार झालेला विद्यार्थी नवीन शेखरप्पा यांच्या वडिलांचा आरोप
स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना हे लज्जास्पद ! ही स्थिती हिंदु राष्ट्रात पालटली जाईल ! – संपादक
हावेरी (कर्नाटक) – वैद्यकीय महाविद्यालयांतील जातीयवाद आणि लाचखोरी, यांमुळे डॉक्टर बनू पहाणारे भारतातील विद्यार्थी युक्रेनकडे जात आहेत, असा आरोप युक्रेन येथे रशियाच्या हवाई आक्रमणात ठार झालेला वैद्यकीय शिक्षण घेत असलेला भारतीय विद्यार्थी नवीन शेखरप्पा याचे वडील शेखरप्पा ज्ञानगौडा यांनी केला.
Bribes in Private Medical Colleges, Casteism Force Bright Students to Go Abroad: Father of Indian Boy Killed in Ukraine
Read here: https://t.co/RJmvgDIQIi pic.twitter.com/rGRK7tCb9z
— News18.com (@news18dotcom) March 2, 2022
शेखरप्पा ज्ञानगौडा म्हणाले की, खासगी महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय शिक्षणाची जागा मिळवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. यामुळेच वैद्यकीय शिक्षण घेणे देशात कठीण झाले आहे. मी राजकीय प्रणाली, शिक्षणव्यवस्था आणि जातीयवाद यांमुळे दुःखी आहे; कारण सर्व काही खासगी संस्थांच्या नियंत्रणात आहे. माझ्या मुलाला इयत्ता १० वीत ९६ टक्के, तर १२ वीत ९७ टक्के गुण मिळाले होते. त्यामुळे त्याने डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहिले होते. शिक्षणप्रणाली आणि जातीयवाद यांमुळे त्याला वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जागा मिळाली नाही. वास्तविक तो हुशार विद्यार्थी होता. महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय जागा मिळवण्यासाठी १-२ कोटी रुपये लाच द्यावी लागते. (सर्व सरकारांसाठी याहून मोठी लज्जास्पद गोष्ट दुसरी कुठली असेल ? सरकार या प्रकरणाची चौकशी करून सबंधितांवर कारवाई करणार का ? – संपादक) युक्रेनमध्ये काही लाख रुपयांमध्ये वैद्यकीय शिक्षण मिळत असेल, तर भारतात कोट्यवधी रुपये का खर्च करावे ? युक्रेनमध्ये चांगले शिक्षण मिळते आणि भारताच्या तुलनेत तेथील उपकरणेही चांगली आहेत.
खारकीवमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांशी भारतीय दूतावासाने संपर्क केलेले नाही ! – शेखरप्पा ज्ञानगौडा यांचा दावा
भारतीय दूतावासामधील कोणत्याही व्यक्तीने खारकीवमध्ये अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांशी संपर्क केलेला नाही, असा दावा शेखरप्पा ज्ञानगौडा यांनी केला. खारकीवमध्ये सहस्रो भारतीय विद्यार्थी अडकून पडले असून ते छावण्यांमध्ये रहात आहेत.