सनातन संस्थेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी लावलेल्या ग्रंथप्रदर्शनास भाविक-जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
प्रदर्शन लावण्यात धर्मप्रेमींचा सक्रीय सहभाग, तर प्रदर्शनस्थळी मान्यवरांच्या भेटी
कोल्हापूर, १ मार्च (वार्ता.) – सनातन संस्थेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात आणि कर्नाटक येथे ३४ ठिकाणी विविध शहरांत, ग्रामीण पातळीवर ग्रंथप्रदर्शन आणि सात्त्विक उत्पादने यांचे कक्ष उभारण्यात आले होते. या कक्षास भाविक-जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हे प्रदर्शन लावण्यात धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ यांचा सक्रीय सहभाग होता, प्रत्येक प्रदर्शनस्थळी मान्यवरांनी भेटी दिल्या. जिल्ह्यातील अनेक मंदिरांमध्ये ‘ॐ नम: शिवाय ।’ हा सामूहिक नामजप घेण्यात आला.
मान्यवरांच्या भेटी
कोल्हापूर येथे राज्य नियोजन महामंडाळाचे अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर, इचलकरंजी येथे शाहूनगर विभागाचे बजरंग दलाचे प्रमुख श्री. अनिकेत तानुगडे आणि त्यांचे सहकारी, माजी आमदार श्री. कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी नगरसेवक श्री. राजेंद्र डकरे यांसह अन्य यांनी प्रदर्शनस्थळी भेटी दिल्या.
संकेश्वर या ठिकाणी २८ फेब्रुवारीच्या रात्रीपासून प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी त्या वेळेपासूनच जिज्ञासूंचा ओघ होता. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेली २ वर्षे प्रदर्शन न लागल्याने जिज्ञासूंनी मोठ्या प्रमाणात भेट घेऊन ग्रंथांविषयी माहिती जाणून घेतली. तसेच गडहिंग्लज ग्रामीण भागात प्रतिसाद चांगल्या प्रमाणात होता.
शिरोली येथील वैशिष्ट्यपूर्ण घटना
अ. शिरोली येथील महादेव मंदिर येथील पुजारी आणि धर्मप्रेमी श्री. उत्तम पाटील यांच्या पुढाकाराने महाशिवरात्रीच्या निमित्ताने महादेव मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या सौ. साधना गोडसे यांचे ‘शिव’ या विषयावर प्रवचन झाले. याचा लाभ १०० पेक्षा अधिक जिज्ञासूंनी घेतला. प्रवचन झाल्यावर येथे सनातन संस्थेच्या ‘चैतन्यवाहिनीवर’ असलेला ‘ॐ नम: शिवाय ।’ हा नामजप सामूहिकरित्या घेण्यात आला. या वेळी श्री. उत्तम पाटील म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था हे धर्माचरण कसे करावे ? याची चांगली माहिती देतात. याचा भाविकांनी लाभ करून घ्यावा आणि त्याप्रमाणे आचरण करावे.’’
आ. या मंदिरात गेल्या ६ वर्षांहून अधिक काळ सकाळी ६ ते ७ आणि सायंकाळी ६ ते ७ ध्वनीक्षेपक यंत्रणेद्वारे ‘ॐ नम: शिवाय ।’ हा नामजप लावण्यात येतो. या शिवाय प्रत्येक सोमवारी सकाळी आणि सायंकाळी ‘ॐ नम: शिवाय ।’ हा सामूहिक नामजप घेण्यात येतो. याला १०० पेक्षा अधिक भाविकांची उपस्थिती असते. मंदिरातील पुजारी श्री. उत्तम पाटील यांनी मंदिरात सर्वत्र ‘ॐ नम: शिवाय ।’ च्या नामपट्ट्या लावल्या आहेत.
इ. येथील धर्मप्रेमी श्री. सतीश पाटील यांनी सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित केलेला शिवाची लहान १०० चित्रे प्रायोजित केली. या चित्रांचे पुजारी श्री. उत्तम पाटील यांनी वितरण केले.
ई. शिरोली येथील धर्मप्रेमी श्री. तानाजी पाटील यांनी सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या ‘ॐ नम: शिवाय ।’ या नामजपाच्या १०० पट्ट्या प्रायोजित केल्या. या नामपट्ट्या धर्मप्रेमी सौ. धनश्री उन्हाळे या आणि त्यांची मुलगी कु. अनुष्का उन्हाळे (वय ८ वर्षे) यांनी समाजातील जिज्ञासूंना वितरित केल्या.
उ. महाशिवरात्रीच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेत धर्मप्रेमींचा सहभाग होता.
पुढील काळात सनातनचे कार्य वाढत जाणार ! – षट्स्थळ ब्रह्मीभूत श्री गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी
गडहिंग्लज येथील महादेव मंदिर येथे लावण्यात आलेल्या प्रदर्शनास नूल येथील सुगीश्वर मठाचे षट्स्थळ ब्रह्मीभूत श्री गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी भेट दिली. ‘‘सनातन संस्थचे कार्य चांगले असून साधक चांगल्या प्रकारे सेवा करतात. यापुढील काळात सनातनचे कार्य वाढत जाणार आहे’’, असे आशीर्वादही स्वामीजींनी दिले. या वेळी स्वामीजींना ‘शिवाच्या उपासनेमागील शास्त्र’ हा ग्रंथ भेट देण्यात आला.