करंजे (जिल्हा सातारा) येथे कर थकवल्यामुळे २ जणांच्या मालमत्ता ‘सील’ !
मालमत्ता ‘सील’ करण्यासमवेत कठोर कारवाई होणे आवश्यक ! – संपादक
सातारा, १ मार्च (वार्ता.) – नगरपालिकेची घरपट्टी थकवल्यामुळे करंजे पेठेतील २ जणांच्या मालमत्ता पालिका अधिकार्यांनी ‘सील’ केल्या आहेत. ही कारवाई अशीच चालू रहाणार असून नागरिकांनी थकीत घरपट्टी तात्काळ भरावी, असे आवाहन सातारा नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वीच पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी पालिकेत विशेष बैठक आयोजित केली होती. यामध्ये बापट यांनी थकीत घरपट्टी असणार्या मालमत्ताधारकांवर धडक कारवाई करावी, अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार पालिकेने धडक मोहीम हाती घेतली आहे. करंजे पेठेतील अफजल बागवान यांच्याकडे १० लाख रुपये, तर विजय धनावडे यांच्याकडे २ लाख ४४ सहस्र रुपये घरपट्टी थकीत आहे. वारंवार सूचना करूनही ते थकीत घरपट्टी भरत नसल्यामुळे त्यांच्या मालमत्ता ‘सील’ करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेचे साहाय्यक कर निरीक्षक अतुल दिसले यांनी दिली आहे.