धर्मांधांची आक्रमणे रोखण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचे स्मरण करा ! – विक्रम घोडके, हिंदु जनजागृती समिती

श्री. विक्रम घोडके

कुर्डूवाडी (जिल्हा सोलापूर) – सध्या अनेक ठिकाणी इस्लामी आक्रमणे होत आहेत. आता ही आक्रमणे छत्रपती शिवरायांच्या गड-दुर्गांवरही होत आहेत. पावनखिंडीतील अतुलनीय पराक्रमाची प्रचीति देणार्‍या विशाळगडावर ६४ हून अधिक अनधिकृत बांधकामे झाली आहेत. छत्रपती शिवरायांनी ५ इस्लामी पदपातशाह्या संपवल्या; मात्र हिंदूंना छत्रपती शिवरायांचा विसर पडल्याने धर्मांधांची आक्रमणे अद्यापही थांबलेली नाहीत. त्यामुळे धर्मांधांची आक्रमणे थांबण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचे स्मरण करणे आवश्यक आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. विक्रम घोडके यांनी केले. ते म्हैसगाव येथील पवार वस्ती येथे शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

या वेळी विठ्ठल साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्री. वामनभाऊ उबाळे, जिल्हा परिषद सदस्य श्री. आप्पासाहेब वामनराव उबाळे, तसेच श्री. विलास नाना उबाळे या मान्यवरांसह १०० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचा आरंभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपूजनाने करण्यात आला, तर सूत्रसंचालन धर्मप्रेमी सौ. ज्योती जाधव यांनी केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिनेश पुजारे आणि त्याच गावातील शौर्यजागृती वर्गामध्ये सहभागी होणार्‍या युवकांनी स्वरक्षण प्रशिक्षणाविषयी प्रात्यक्षिके सादर केली.

छत्रपती शिवाजी महाराजांना सध्या विशिष्ट जातीपुरते मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे ! – वामनभाऊ उबाळे

छत्रपती शिवाजी महाराजांना सध्या विशिष्ट जातीपुरते मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराजांनी १८ पगड जातींना समवेत घेऊन ‘हिंदवी स्वराज्य’ निर्माण केले, अशा स्वराज्याला ईश्वराचे आशीर्वादही होते.

वैशिष्ट्यपूर्ण

१. या वेळी अनेकांनी ‘हिंदु जनजागृती समिती हिंदूंना संघटित करण्याचे योग्य कार्य करत आहे’, असा अभिप्राय दिला.

२. येथील धर्मप्रेमी युवकांनी केवळ ३ दिवसांत शौर्यजागृती वर्गामध्ये सहभागी होऊन स्वरक्षणाची प्रात्यक्षिके शिकून त्यांनी ती सादर केली.