रशिया-युक्रेन युद्धातील महत्त्वाच्या घडामोडी आणि भारताने करावयाची पूर्वसिद्धता !

१. रशियाच्या दादागिरीला न घाबरता युक्रेनची जनता लढण्यासाठी सिद्ध झाल्याने युद्ध लांबणे

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

‘माध्यमांमधून येत असलेल्या बातम्यांवरून असे दिसते की, रशियाने युक्रेनच्या कीव या राजधानीला ३ दिशेने वेढा दिलेला आहे. असे असतांनाही या राजधानीवर आक्रमण करण्याची कारवाई व्यवस्थितपणे चालू झालेली नाही. त्यांनी घातलेल्या वेढ्यामधून अनेक युक्रेनचे नागरिक विशेषत: महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक बाहेर पडत आहेत. रशियाला वाटले होते की, आपण युक्रेनच्या आत रणगाडे पाठवले, ‘क्रूझ’ क्षेपणास्त्रे सोडली, तोफखाना वापरला, हेलिकॉप्टर्स आकाशात उडवले, विमानांचा वापर केला, तर युक्रेन घाबरेल; पण एवढे करूनही युक्रेनची जनता आणि नेतृत्व घाबरले नाही. सध्या तरी युक्रेनचे नेतृत्व आणि सैन्य लढत आहे अन् त्यांचे नागरिकही देशासाठी सैन्यात भरती होण्यासाठी सिद्ध आहेत. पुतिन यांच्या आक्रमक कारवाईमुळे युक्रेनमध्ये भय निर्माण झाले नाही. उलट त्यांचे नागरिक लढण्यासाठी अधिक सिद्ध झाले आहेत. त्यामुळे रशिया युक्रेनवर लवकरच ताबा मिळवेल, याची शक्यता लांबली आहे.

२. रशियाचे आर्थिक निर्बंध कठोर केले जाणे

युक्रेनला बाहेरून शस्त्रास्त्रांचे साहाय्य मिळत आहे. रशियाचे नियंत्रण युक्रेनच्या पूर्वेच्या दिशेने असलेल्या भागात आहे; पण युक्रेनच्या पश्चिमेला असलेला भाग, जो ‘नाटो’च्या इतर देशांना लागून आहे, तेथे रशियाचे सैन्य नाही. रशियावर आर्थिक निर्बंध अधिक कठोर करण्यात येत आहेत, तसेच पुतिन यांची वैयक्तिक संपत्तीही कह्यात घेण्यात येत आहे. रशियाने युरोप आणि अमेरिका यांमध्ये आर्थिक संपत्ती निर्माण केली होती. त्यावर लवकरच निर्बंध लागतील, यात काही शंका नाही.

३. ‘नाटो’ शांततावादी बनल्याने त्यांनी खरोखरचे युद्ध लढण्यासाठीची आवश्यक क्षमता न वाढवणे

‘नाटो’हा जगातील सर्वांत मोठा संरक्षणविषयक गट आहे. त्यांचे एक ब्रिटीश जनरल जे ‘नाटो’चे क्रमांक दोनचे सेनापती होते, त्यांचा एक लेख प्रकाशित झाला आहे. ते म्हणतात, ‘गेल्या दीड दशकात नाटोमधील लोक इतके शांततावादी बनले आहेत की, त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रांचे आधुनिकीकरण झालेले नाही आणि त्यांच्या सैनिकांचे फारसे प्रशिक्षणही होत नाही. त्यांनी सैनिकांची शक्ती न्यून करत आणली आहे. ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी यांच्याकडे अचानक लढाई झाली, तर त्यांच्याकडे शत्रूशी स्थुलातून लढण्यासाठी एक डिव्हिजन (एका गटामध्ये १५ ते २० सहस्र सैनिक आणि शस्त्रास्त्रे) सैन्यही सिद्ध नाही.’ अमेरिकेकडे लढण्याचे बळ आहे; परंतु ‘नाटो’च्या इतर मोठ्या राष्ट्रांकडे लढण्याची क्षमता नाही आहे.

अनेक लोक विनोदाने म्हणतात, ‘‘नाटो’ने त्यांचे रणगाडे (टँक) ‘थिंकटँक’मध्ये (तज्ञांच्या वैचारिक गटामध्ये) परावर्तित केले आहेत.’ ‘नाटो’ला वाटले की, आपण माध्यमांमध्ये चर्चा आणि वादविवाद करत राहू अन् थोडीफार शस्त्रे ठेवून लोकांना घाबरवून टाकू. त्यांना कळायला पाहिजे होते की, पुतिन हे महाभयंकर नेते असून त्यांना अशा कुठल्याही गोष्टींची भीती वाटत नाही. आपल्या नेतृत्वाच्या गुणावर काय करू शकतो, हे पुतिन यांनी दाखवून दिले आहे. या युद्धाविषयी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या धोरणावर आता त्यांचेच लोक उलटसुलट प्रतिक्रिया देत आहेत. अमेरिकेतील मुख्य राष्ट्रीय पक्ष त्यांच्या अध्यक्षांच्या धोरणाच्या विरोधात जात आहेत. असेच भारतातही होत असते. त्यामुळे केवळ चर्चा करण्याची पद्धत थांबवून कारवाई करणे महत्त्वाचे असते.

४. भारतातील कथित तज्ञ युद्धाविषयी काय बोलणार आहेत ?

काही तथाकथित तज्ञ सांगायचे, ‘२१ व्या शतकात युद्ध हे होणारच नाही.’ त्यांचे भाकित किती चुकीचे होते, हे या परिस्थितीवरून लक्षात येते. भारतात उंटावरून शेळ्या हाकणारे काही तज्ञ म्हणायचे, ‘शस्त्रांची काही आवश्यकता नाही. आपल्याला केवळ आपले आर्थिक बळ वाढवायला पाहिजे. नुसत्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भारत लढाई जिंकू शकेल.’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केवळ लहान राज्यांशी लढाई लढता येईल. लढाईमध्ये सैनिक आणि त्याचे शस्त्र महत्त्वाचे असते. अनेक वेळा शस्त्रास्त्रांसमवेत सैनिकांची लढण्याची वृत्ती अधिक महत्त्वाची असते.

५. भारतीय विद्यार्थ्यांना भारतातच अल्प व्ययामध्ये शिक्षण उपलब्ध करून दिले पाहिजे !

‘सेंट्रल एशियन रिपब्लिक्स’मध्ये अर्ध्या किंमतीत वैद्यकीय शिक्षण होते. त्यामुळे तेथे सहस्रो भारतीय विद्यार्थी शिकण्यासाठी जात आहेत. पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच म्हटले आहे, ‘भारताच्या खासगी महाविद्यालयांनी अधिक महाविद्यालये उघडली पाहिजे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना देशाबाहेर जाण्याची आवश्यकता पडणार नाही.’ भारतात खासगी आणि सरकारी क्षेत्र यांनी यावर विचार करून वैद्यकीय शिक्षणाचा व्यय अल्प करण्यासाठी प्रयत्न करावा.

६. युद्धातून भारताने बोध घेणे आवश्यक !

या युद्धापासून भारताला शिकता येईल की, अनेक मित्र राष्ट्र करार करून ‘आम्ही तुम्हाला साहाय्य करू’, असे सांगतात; पण वेळ पडली, तर ते साहाय्य करतीलच, असे नाही. त्यामुळे आपण संरक्षणामध्ये आत्मनिर्भर व्हायला पाहिजे आणि सर्व मोठी शस्त्रे ही भारतातच बनवली पाहिजेत, याला पर्याय नाही.’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.