महाविनाशकारी संग्रामाचा आरंभ : जीव वाचवण्यासाठी भगवंताला शरण जाणे, हाच एकमेव पर्याय ! – प.पू. दास महाराज
रशियाने २४.०२.२०२२ या दिवशी पहाटे युक्रेनवर आक्रमण करत अखिल विश्वाला तिसर्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर प.पू. दास महाराज यांनी साधक आणि हिंदु समाज यांना केलेली विनंती अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी केलेली प्रार्थना येथे देत आहोत.
१. संत, भविष्यवेत्ते, पंचांग यांमध्ये तिसर्या महायुद्धाचा उल्लेख आढळणे
‘४०० वर्षांपूर्वी भविष्यवेत्ते नॉस्ट्रेडॅमस याने आणि वर्ष १९९० मध्ये थोर संत प.पू. गगनगिरी महाराज यांनी सध्या पृथ्वीवर चालू झालेल्या आपत्काळाची पूर्वसूचना दिली होती, तसेच आप्पाचीवाडी-कुर्ली येथील जागृत दैवत श्री देव हालसिद्धनाथ यांच्याकडून गेल्या काही वर्षांपासून आपत्काळाविषयी भक्तांना सावध केले जात आहे. ‘आगामी काळ हा घोर आपत्काळ आहे. या आपत्काळात तिसर्या महायुद्धामुळे जगाचा थरकाप उडेल. प्रचंड नरसंहार होईल. रक्ताचे पाट वहातील’, अशी जाणीव देवाने गेल्या काही वर्षांत मानवाला करून दिली आहे. आगामी आपत्काळाविषयीची नोंद अनेक ज्योतिषांनीही त्यांच्या त्यांच्या पंचांगात केलेली आहे.
२. महायुद्धाचा पृथ्वीतलावर दूरगामी परिणाम होणार असणे
तिसर्या अत्यंत महाविनाशकारी महायुद्धाची ठिणगी पडलेली असतांना सुखाधीन जीवनात लिप्त झालेल्या बहुतांश भारतियांना या संकटाचे अजूनही गांभीर्य वाटत नाही. आज युक्रेनमध्ये जो युद्धाग्नी पेटला आहे, त्याच्या ज्वाळा या निरनिराळ्या पद्धतीने जगाच्या कानाकोपर्यात पसरत जातील. रोगराई, आर्थिक मंदी, औषधांचा तुटवडा, बेरोजगारी, अन्नधान्याची टंचाई, अशा विविध रूपाने हे महासंकट आणखी २ वर्षे मानवाला सतावत राहील. या महायुद्धाचे पृथ्वीतलावर दूरगामी परिणाम होणार, हे निश्चित !
३. तिसर्या महायुद्धाचा भारतावरही गंभीर परिणाम होणे
२० व्या शतकात पहिले आणि दुसरे विश्वयुद्ध युरोप खंडातच झाले होते. यामध्ये अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आदी देशांनी प्रमुख भूमिका बजावली होती. आता हेच देश पुन्हा महाभयंकर अशा तिसर्या महायुद्धासाठी पुढे सरसावले आहेत. या देशांकडे जी परमाणू शस्त्रास्त्रे आहेत, ती इतकी भीषण आहेत की, त्यांचा उपयोग झाल्यास केवळ एका प्रदेशावर नव्हे, तर संपूर्ण पृथ्वीवर त्याचे परिणाम होऊन तिचा महाविनाश होईल, अशी स्थिती आहे. हे युद्ध प्रत्यक्ष युरोपमध्ये होत असले, तरी भारतासह अन्य देशांमध्ये गृहयुद्धे आरंभ होतील.
४. परात्पर गुरुदेवांचे दैवी कार्य चालू असून त्यांना शरण जाणे, हाच एकमेव पर्याय !
पाश्चात्त्य देशांनी भूमी, समुद्र आणि आकाश मार्गे परमाणू शस्त्रे सज्ज ठेवली आहेत. परमाणू शस्त्रांमुळे पंचमहाभूतांवर गंभीर परिणाम झाल्यास संपूर्ण जीवसृष्टीत हाहाःकार माजेल. पृथ्वी, आप, तेज आणि वायु यांच्यावर त्याचा परिणाम होणार आहे. भारतभूमीत अनेक संत उपासना करत आहेत, तसेच महाविनाशकारी संकटातून साधकांचे रक्षण करण्यासाठी श्रीमन्नारायण स्वरूप परात्पर गुरुदेवांचे दैवी कार्य चालू आहे. ते साधकांसह समस्त सात्त्विक जिवांकडून आपत्कालीन सिद्धता करवून घेत आहेत. त्यांच्या कृपाछत्राखाली जे जीव रहातील, ते तरून जातील.
‘तिसर्या महायुद्धामुळे पृथ्वीवरील रज-तम लहरी मोठ्या प्रमाणावर वाढतील. त्यामुळे या महायुद्धानंतर संपूर्ण पृथ्वीवरील सात्त्विकता वाढण्यासाठी पृथ्वीची शुद्धी करावी लागेल. त्यासाठी अनेक संत सिद्ध व्हावे लागतील. याकरता साधकांनी आतापासूनच साधना वाढवणे आवश्यक आहे’, असा संदेश सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी यापूर्वीच दिला असून तेच साधकांची तशी सिद्धता करून घेत आहेत. ‘जसे अधिकोषात (बँकेत) पैसे जमा केलेले असतील, तरच धनादेश वटतात, तसेच संचितामध्ये साधनेचे बळ जमा झाले, तरच देवाचा धावा केल्यानंतर आपण संकटातून तरून जाणार’, हे सूत्र लक्षात घेऊन समस्त हिंदु समाजानेही धर्माचरण करावे आणि साधना करावी. कर्ता आणि करविता हे परात्पर गुरुदेवच असल्याने आपण त्यांनाच शरण जाऊया.
५. परात्पर गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना !
‘हे परात्पर गुरुदेव, हे दीनदयाळा, आम्ही तुझीच लेकरे आहोत. तुझ्याविना आम्हाला तारणारा कोण आहे ? तू आमची माऊली आहेस. आमच्यावर कृपा करा. आमच्यातील साधनेचे गांभीर्य वाढवा. जसे आपण गजेंद्राला महासंकटातून तारले, तसे या घनघोर आपत्काळात आम्हा साधकांचे रक्षण करा’, अशी आपल्या कोमल चरणी शरणागत भावाने प्रार्थना आहे.
– परात्पर गुरुदेवांचा चरणसेवक प.पू. दास महाराज, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.२.२०२२)