युक्रेन-रशिया युद्धामध्ये युक्रेन देत असलेला लढा !
‘रशियाने जरी युक्रेनच्या कीव राजधानीला वेढले, तरी त्यांना ही राजधानी कह्यात घेण्यास यश मिळालेले नाही. अमेरिकेने ‘युक्रेनच्या अध्यक्षांना बाहेर काढतो’, असे सांगितले होते; पण युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेंस्की यांनी ‘मी या राजधानीच्या आतच लढीन’, असे उत्तर दिले. तसेच त्यांनी त्यांच्या देशाला संबोधितही केले. ‘रशियाच्या सैन्याच्या हातात आपली (युक्रेनची) राजधानी पडायला नको. त्यामुळे सर्व नागरिकांनी हातात शस्त्र घेऊन या लढाईमध्ये सहभागी व्हावे’, असे आवाहन झेलेंस्की यांनी केले. सध्या तरी रशियाचे आक्रमण थोपवण्यास युक्रेनच्या सैन्याला यश मिळाले आहे. याखेरीज युक्रेनच्या अन्य शहरांमध्येही अशाच प्रकारची लढाई चालू आहे.
दुसरीकडे पुतिन यांना कळले आहे की, त्यांच्या सैनिकांचे युक्रेनमध्ये पुष्कळ रक्त सांडत आहे. त्यामुळे रशियाने युक्रेनला वाटाघाटीसाठी आवाहन केले आहे. रशियाला वाटते की, या वाटाघाटी रशियामध्ये व्हाव्यात; पण सध्या तरी बेलारूसमध्ये चर्चा होत आहे. तेथे युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की जाणे शक्य नाही. ते तेथे गेले, तर रशिया त्यांना तेथून जिवंत परत जाऊ देणार नाही. त्यामुळे एकूणच वाटाघाटींवरही एक प्रश्नचिन्ह आहे.
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.