पू. नीलेश सिंगबाळ यांच्या परिवाराशी एकरूप झालेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या त्यांच्या गृहकृत्य साहाय्यक सुश्री (कु.) कला खेडेकर (वय ५३ वर्षे) !
७.२.२०२२ या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक संत पू. नीलेश सिंगबाळ यांच्या मातोश्री आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या सासूबाई पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ यांना फोंडा, गोवा येथील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या एका सोहळ्यात सनातनच्या ११७ व्या संत म्हणून घोषित करण्यात आले. याच सोहळ्यात सिंगबाळ कुटुंबियांच्या गृहकृत्य साहाय्यक सुश्री (कु.) कला खेडेकर (वय ५३ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असल्याचे घोषित करण्यात आले. या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सुश्री (कु.) कला खेडेकर यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला. ९.२.२०२२ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये या सत्काराचा वृत्तांत प्रसिद्ध करण्यात आला आहे. आता श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितलेली सुश्री (कु.) कलाताई यांच्याविषयीची गुणवैशिष्ट्ये पाहू.
आम्हाला पुष्कळ साहाय्य करणार्या सुश्री (कु.) कलाताई यांच्याकडून परात्पर गुरुदेवांनी नकळतपणे समष्टी सेवाही करवून घेतली ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ
‘आमच्या परिवाराला कलाताईंविना पूर्णत्व नाही. कलाताई आमच्या परिवाराशी एकरूप झाल्या आहेत. पू. आजी (पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ) कलाताईंवर घरातील सर्व दायित्व सोपवून निश्चिंत असतात. माझ्या साधनेतील आणि सेवेतील वेळ जाऊ नये; म्हणून माझा मुलगा सोहम् याचे अन् घराचे तिने दायित्व घेऊन काळजी घेतली. कलाताई नसती, तर मला सेवा करणे शक्यच झाले नसते. पू. (श्रीमती) सिंगबाळआजी यांची काही शस्त्रकर्मे झाली आहेत. पू. आजींची शस्त्रकर्मे झाल्यानंतर कलाताईने त्यांचीही दायित्व घेऊन काळजी घेतली. त्यामुळे मी त्या काळातही झोकून देऊन सेवा करू शकले. माझा वेळ अधिकाधिक समष्टीसाठी वापरता यावा, यासाठी अनेक प्रसंगांत न सांगताही तिने आम्हाला पुष्कळ साहाय्य केले आहे. या माध्यमातून परात्पर गुरुदेवांनी नकळतपणे तिच्या हातून समष्टी सेवाही करवून घेतली.’
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सुश्री (कु.) कलाताई खेडेकर यांच्याविषयी काढलेले कौतुकोद्गार !
‘सुश्री (कु.) कलाताई खेडेकर ही साधकांना आणि इतरांनाही प्रेमाने लगेच आपलेसे करून घेते. ती ‘आईचा (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ हिचा) अधिकाधिक वेळ समष्टीसाठी वापरला जावा’, याची काळजी घेते. याचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पुष्कळ कौतुक वाटले. ८.२.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘जगात कुणाला कलाताईंसारख्या साधकत्व असलेल्या गृहकृत्य साहाय्यक मिळतील, असे नाही. त्या इतक्या चांगल्या आहेत !’’
– श्री. सोहम् सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.२.२०२२)
कुटुंबातील सदस्याप्रमाणे पू. नीलेश सिंगबाळ यांच्या घराचे दायित्व सांभाळणार्या गोवा येथील सुश्री (कु.) कला खेडेकर !
१. ३९ वर्षे कुटुंबातील सदस्याप्रमाणे साधकांच्या घरी रहाणे
‘सुश्री (कु.) कला खेडेकर यांचे मूळ गाव गोव्यातील सावईवेरे येथे आहे. मी बारावीचे शिक्षण घेत असतांना त्या आईला घरकामात साहाय्य करण्यासाठी आमच्याकडे आल्या. गेली ३९ वर्षे त्या आमच्या समवेत आहेत. त्यांचा जन्म वेगळ्या कुटुंबात झाला असला, तरीही ‘त्यांचा आमच्या कुटुंबाशी अनेक जन्मांचा संबंध आहे’, असे मला वाटते. त्या आम्हाला आमच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणेच वाटतात.
२. वडिलांनी सावईवेरे येथे स्थलांतर केल्यावर कलाताईंनी स्वतःच्या घरी न रहाता पू. नीलेश सिंगबाळ यांच्या घरी रहाणे
माझ्या वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतर आम्ही आमच्या मूळ गावी, म्हणजे सावईवेरे येथील घरी रहायला गेलो. त्या वेळी कलाताईही आमच्या समवेत आल्या. त्यांचेही घर त्याच गावात होते, तरीही त्यांनी घरी न जाता आमच्याकडे राहून आईला घरकामात साहाय्य करणे चालू ठेवले. त्या आमच्या कुटुंबाशी इतक्या एकरूप झाल्या आहेत की, त्या केवळ श्राद्ध, श्री गणेशचतुर्थी अशा महत्त्वाच्या वेळीच, म्हणजे वर्षातील ३ – ४ वेळाच त्यांच्या घरी जातात.
३. कलाताईंनी सोहम्ला सांभाळून घरातील सर्व कामे केल्यामुळे आम्हा दोघांना (मी आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा यांना) नोकरी अन् प्रसारसेवा करता येणे
आमचा मुलगा सोहम् अडीच मासांचा असतांना मी आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ फोंडा येथे रहायला आलो. तेव्हा कलाताईही आमच्या समवेत आल्या. आम्ही दोघेही नोकरी करून प्रसारसेवा करत होतो. त्यामुळे आम्ही दोघेही घरी संध्याकाळी उशिरा, तर कधी रात्री येत होतो. कलाताई अडीच मासांच्या सोहम्ला अत्यंत प्रेमाने आणि मन लावून सांभाळत असत. त्या घरी स्वयंपाक करणे, स्वच्छता करणे इत्यादी कामे करत असत. नंतर आम्ही प्रसारसेवेत अधिक व्यस्त झाल्याने कलाताईंवर ‘घरातील कामे आणि सोहम्ला सांभाळणे’ हा भार साहजिकच वाढला, तरीही त्यांनी त्याचा कधीच कंटाळा किंवा गार्हाणे न करता घरातील सर्व कामाचे दायित्व पाहिले. सोहम्लाही कलाताईंविषयी पुष्कळ प्रेम वाटू लागले. त्या घरातील सर्व कामे करत असल्याने आम्हा दोघांनाही निश्चिंत होऊन प्रसारसेवा करता येत होती.
४. उत्तर भारतात सेवारत असतांना कलाताई घरी सर्वकाही दायित्व घेऊन आणि आत्मीयतेने पहात असल्याने मी निश्चिंत असणे
वर्ष १९९९ मध्ये मी आणि काही कालावधीने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ पूर्णवेळ साधना करू लागलो. वर्ष २००४ मध्ये मी उत्तर भारतात सेवेसाठी गेलो. तेव्हा सोहम् केवळ पाच वर्षांचा होता. मी घरी नसल्याने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि कलाताई यांच्यावर घराचे दायित्व आले. त्याही परिस्थितीत त्यांनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा यांना घर सांभाळण्यात आणि साधनेत उत्तम सहकार्य केले. मी उत्तर भारतात १८ वर्षे सेवारत आहे. कलाताई आमच्या घरी राहून सर्वकाही दायित्व घेऊन आणि आत्मीयतेने पहात आहेत. त्यामुळे मी निश्चिंत असतो. केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेनेच आम्हाला व्यावहारिक जीवन आणि साधना यांसाठी पूरक अशा कलाताई मिळाल्या. त्याबद्दल मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञता वाटते.
५. कलाताईंनी रुग्णाईत आईंची सेवा मन लावून करणे
माझ्या वडिलांच्या निधनानंतर माझ्या आई आमच्याकडे रहायला आल्या. आता त्यांचे वय ८२ वर्षे आहे. आईंची काही मोठी शस्त्रकर्मे झाली आणि आता वयोमानानुसार त्या रुग्णाईत असतात. कलाताई आईंना समजून घेतात आणि त्यांना ‘हवे-नको’, हे पाहून त्यांची मन लावून सेवा करतात.
६. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने लाभलेल्या कलाताईंमुळे साधना सुरळीत चालू आहे’, असे वाटणे
कलाताईंनी स्वतःला आमच्या कुटुंबासाठी वाहून घेतले आहे. स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी कुणीही त्याग करील; पण ‘दुसर्याच्या कुटुंबासाठी स्वतःला निरपेक्षपणे वाहून घेणे आणि त्याग करणे’, याचे कलाताई या लाखातील एखादे उदाहरण असेल. हे केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळेच आम्हाला पहायला अन् प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले आहे. त्यांच्याच कृपेने कलाताई आमच्या साधनेसाठी वरदान ठरल्या आहेत.
७. कलाताईंत परात्पर गुरु डॉ. आठवले आणि रामनाथी आश्रम यांच्याप्रती श्रद्धा अन् भाव असणे
कलाताई नामजपादी उपाय करतात. त्या दैनिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन आणि गुरुपौर्णिमा’ या सोहळ्यांच्या वेळी आश्रमात येतात. त्यांच्यात परात्पर गुरु डॉक्टर आणि रामनाथी आश्रम यांच्याप्रती श्रद्धा अन् भाव आहे. आता त्या केवळ आमच्या राहिल्या नसून सनातन परिवाराच्या झाल्या आहेत. त्यांना पाहिल्यावर ‘त्यांची साधना चांगली चालू आहे’, असे मला जाणवते.’
– (पू.) नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक संत, वाराणसी, उत्तरप्रदेश. (११.१.२०२२)