तुम्ही आमच्या समवेत आहात, हे सिद्ध करा !
व्लोदिमिर झेलेंस्की यांचे युरोपीयन संसदेला आवाहन
कीव (युक्रेन) – आम्ही आमची भूमी आणि स्वातंत्र्य यांच्यासाठी लढत आहोेत. आमची सर्व शहरे अद्यापही अजेय आहेत. कुणीही ती भेदू शकणार नाहीत. आम्ही भक्कम आहोत. युक्रेनचे मनोबल खचलेले नाही. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढू. आम्ही तुमच्या समवेत आलो, तर युरोपीयन युनियन अजून सक्षम होईल; पण तुमच्याविना युक्रेन एकटा पडेल. आम्ही आमचे सामर्थ्य सिद्ध केले आहे. आम्ही किमान हे तरी सिद्ध केले आहे की, आम्हीदेखील तुमच्यासारखेच आहोत. त्यामुळे आता तुम्ही हे सिद्ध करा की, तुम्हीदेखील आमच्यासमवेत असून तुम्ही आम्हाला एकटे सोडणार नाही. तरच जीवनाचा मृत्यूवर विजयी होईल. प्रकाशाचा अंधारावर विजय होईल, असे आवाहन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी युरोपीयन संसदेला ‘ऑनलाईन’ संबोधतांना केले. या वेळी संसदेच्या सदस्यांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात झेलेंस्की यांचा सन्मान केला.
यूरोपीय संसद में बोले यूक्रेन के राष्ट्रपति जेलेंस्की #RussiaUkraineConflict #RussiaUkraineCrisis #Russia #Ukraine #UkraineRussiaCrisis #UkraineRussia #UkraineCrisis pic.twitter.com/MJX6h0R0Ms
— Oneindia Hindi (@oneindiaHindi) March 1, 2022
पुतिन लहान मुलांना मारून कोणते युद्ध लढत आहेत ?
झेलेंस्की पुढे म्हणाले की, आजचा दिवस आमच्यासाठी दुर्दैवी ठरला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी लहान मुलांनाही सोडले नाही. रशियाच्या आक्रमणात आमची १६ मुले मारली गेली. पुतिन वारंवार हेच सांगत आहेत की, ते ‘सैनिकी कारवाई’ करत असून केवळ सैन्याच्या तळाला लक्ष्य करत आहेत; परंतु रशियाच्या आक्रमणात लहान मुलेही ठार झाली आहेत. त्यामुळे रशिया नेमकी कोणत्या प्रकारची ‘सैनिकी कारवाई’ करत आहे ? कोणते रणगाडे ते घेऊन जात आहेत ? क्षेपणास्त्रे का डागत आहेत ? सकाळी कीवच्या ‘फ्रिडम स्वेअर’ (चौक) येथे २ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. आम्हीसुद्धा युक्रेनी लोकांची शक्ती किती आहे, ते रशियाला दाखवून देऊ. आम्ही रशियाच्या विरोधात भक्कमपणे उभे असून उत्तमपणे लढत आहोत.